Join us  

वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी मजुरांची धावपळ, पन्नास ते तीनशे रुपये आकारुन प्रमाणपत्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2020 6:51 PM

कोरोनामुळे मुंबईत अडकलेल्या व मुंबईतून आपापल्या गावी जाण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या हजारो उत्तर भारतीय मजुरांची गावी जाण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठी धावपळ उडाली आहे.

 

 

मुंबई : कोरोनामुळे मुंबईत अडकलेल्या व मुंबईतून आपापल्या गावी जाण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या हजारो उत्तर भारतीय मजुरांची गावी जाण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठी धावपळ उडाली आहे. काही ठिकाणी प्रति प्रमाणपत्र पन्नास रुपये तर काही ठिकाणी तीनशे रुपये एका प्रमाणपत्रासाठी आकारले जात आहेत. 

गावी जाण्यासाठी पोलिस स्थानकातून परवानगी मिळवण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र सक्तीचे असल्यानेे हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी या नागरिकांची धावपळ होत आहे.  अनेक वैद्यकीय व्यावसायिकांचे दवाखाने सध्या बंद असल्याने या नागरिकांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी विविध ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते,  नगरसेवक यांच्या माध्यमातून खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना बोलावून त्यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करुन प्रमाणपत्र दिले जात आहे. काही ठिकाणी वैद्यकीय व्यावसायिकांकडून त्यांची सामाजिक बांधिलकी म्हणून प्रमाणपत्रासाठी पन्नास रुपये आकारले जात आहेत तर काही वैद्यकीय व्यावसायिक यामध्ये देखील दोनशे ते तीनशे रुपये आकारुन असंवेदनशीलतेचे दर्शन घडवत आहेत. 

वैद्यकीय प्रमाणपत्र मिळाल्यानंतर या नागरिकांना स्थानिक पोलिस स्थानकात जावून वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागत आहे. त्यामुऴे अनेक पोलिस स्थानकात पोलिसांनी स्थानकाबाहेर छोटे टेबल लावून हे प्रमाणपत्र स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. अनेक ठिकाणी डॉक्टर त्यांच्या सोयीने प्रमाणपत्र देण्यासाठी येत असल्याने या नागरिकांना सकाळी सहा सात वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत रांगेत उभे राहावे लागत आहे. एवढे सर्व प्रयत्न केल्यानंतर प्रत्यक्षात जेव्हा गावी जाण्याच्या रेल्वेमध्ये प्रवेश मिळेल तेव्हा हे सर्व प्रयत्न यशस्वी ठरतील. त्यामुळे हे प्रयत्न यशस्वी ठरुन आपापल्या घरी जाण्याची संधी मिळावी अशी प्रार्थना हे नागरिक करत आहेत.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस