'कोरोना संकटकाळातही सत्ताधारी भाजपाला 150 कोटी रुपयांचे ठेके देण्याची लगीनघाई'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 08:33 PM2020-07-11T20:33:32+5:302020-07-11T20:34:54+5:30
सावंत हे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक व स्थायी समिती सदस्य आहेत.
मीरारोड - कोरोना संसर्गा मुळे सर्व सामान्य नागरिक त्रासले असताना मीरा भाईंदर महापालिकेत मात्र सत्ताधारी भाजपाने केवळ 3 स्थायी समिती बैठकीत सुमारे 150 कोटी रुपयांच्या निविदांना मंजुरी दिली आहे. कोविड केअर, अलगीकरण केंद्र व जोशी रुग्णलयातील नागरिकांना चांगले जेवण, सुविधा देऊ न शकणाऱ्या भाजपाला कोट्यवधी रुपयांच्या निविदा मंजूर करण्याची लगीनघाई कोणाचे खिसे भरण्यासाठी ? असा सवाल ज्येष्ठ नगरसेवक अनिल सावंत यांनी केला आहे.
सावंत हे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक व स्थायी समिती सदस्य आहेत. त्यांनी सांगितले कि , विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच भीमसेन जोशी रुग्णालय व मुख्यालयाचा दौरा केला . त्यावेळी फडणवीस यांनी महापालिकांना आणखी मदत सरकार ने करावी असे म्हटले होते . परंतु पालिकेतील सत्ताधारी भाजपाला मात्र जनतेची आणि पालिकेच्या आर्थिक स्थितीशी काहीच सोयरसुतक नाही.
16 व 20 मार्च आणि 26 जून रोजी सत्ताधारी भाजपाने कोरोना संसर्ग काळात देखील स्थायी समितीच्या तीन बैठका घेतल्या . या तिन्ही बैठकीत कॉर्न संसर्गाचा आढावा , त्यावर उपाययोजना आणि नागरिकांना आवश्यक सुविधा देऊन दिला देण्याचा एकही विषय भाजपाने घेतला नाही . परंतु सुमारे 150 कोटी पेक्षा जास्त खर्चाचे अन्य कामांचे ठेके देण्याच्या निविदा मात्र मंजुरीस आणल्या आणि बहुमत असल्याने मंजूर केल्या.
सदर कामे कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आताच मंजुरी देणे आवश्यक नव्हते . कारण आताच कामे सुरु होतील आणि झालीच तरी पालिके कडे पैसे आहेत का ? ती नंतर देखील देता आली. आज शहरामध्ये कोरोना रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांची स्थिती अत्यंत भयावह आहे.आरोग्य कर्मचारी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये प्रामाणिक पणे काम करत आहेत. मनपाचे भाईंदर पश्चिम येथील एकमेव जोशी कोविड रुग्णालय, कोविड केअर व अलगीकरण कक्षातुन रुग्ण आणि नागरिकांच्या उपचार , जेवण , स्वच्छता, गैरसोयी आदींच्या असंख्य तक्रारी आहेत. त्या दूर करण्यासाठी भाजपाची इच्छा नाही आणि त्यावर पैसे खर्च करायची देखील दानत दिसत नाही.
कोरोनाचा कहर वाढतोय पण त्यावर ठोस उपाय केले जात नाहीत . यांचे नेते महापौर दालनात येऊन नियमबाह्य बैठका घेतात त्या या ठेके आणि निविदा मंजुरी साठीच्या असतात कि जनतेच्या हिताच्या ? हेच या सुमारे 150 कोटी रुपयांच्या निविदा मंजुरी वरून लोकांना कळून चुकले आहे असे सावंत म्हणाले . या बाबत भाजपाचे उपमहापौर आणि स्थायी समिती सदस्य हसमुख गेहलोत यांनी मात्र , आम्ही आवश्यक आहेत तीच कामे मंजूर करत आहोत असे स्पष्ट केले . अनेक कामे आम्ही बाजूला ठेवली आहेत . पालिकेची आर्थिक स्थिती पाहूनच कामे हाती घेतली जात आहेत असे ते म्हणाले .