Join us

रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 5:52 AM

वांद्रे स्थानकावर गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेसमध्ये पहाटे तीन वाजता घडली दुर्घटना

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसवर गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेसमध्ये चढताना रविवारी पहाटे तीनच्या सुमारास चेंगराचेंगरीत दहा प्रवासी जखमी झाले. त्यांपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. गाडी फलाटावर येताना ती पकडण्यासाठी प्रवाशांची एकच झुंबड उडाल्याने दुर्घटना घडली.  तिघांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले, तर दोन गंभीर जखमींवर केईएममध्ये उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.छटपूजा व दिवाळीनिमित्त गोरखपूरला जाण्यासाठी पहाटे ५.१० वा. सुटणारी अंत्योदय एक्स्प्रेस यार्डमधून प्लॅटफॉर्म १ वर सव्वादोन तास आधीच येत होती. २२ डब्यांच्या या गाडीत सीट पकडण्यासाठी सुमारे अ़डीच ते तीन हजार प्रवासी एकाचवेळी धावले.   

प्लॅटफॉर्म तिकीट विक्री १२ स्थानकांवर बंदमध्य आणि पश्चिम रेल्वेने चेंगराचेंगरी घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १२ आणि गुजरातमधील ४ स्थानकांवर आता प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद केली आहे. दिवाळी आणि छटपूजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशनवरील गर्दी लक्षात घेऊन प्रमुख रेल्वे स्टेशनवर २७ ऑक्टोबरपासून ८ नोव्हेंबरपर्यंत हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

मध्य रेल्वेची स्थानके : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पुणे, नागपूर.

पश्चिम रेल्वेवरील स्थानके : मुंबई सेंट्रल , दादर, वांद्रे टर्मिनस, बोरिवली, वसई रोड, वापी, वलसाड, उधाना, सुरत

जखमींपैकी दोन प्रवाशांकडे तिकीट होते, तर इतरांकडे नव्हते. त्यामुळे ते प्रवासी होते की नातेवाईक हे समजलेले नाही. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी स्थानकावर ३० ते ३५ कर्मचारी तैनात आहेत. अचानक घडलेल्या या दुर्घटनेची चौकशी सुरू आहे.     - नीरज वर्मा, विभागीय व्यवस्थापक, पश्चिम रेल्वे

 

टॅग्स :मुंबईरेल्वे