लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आनंद, अश्रू, आई-वडिलांना साक्षात समोर बघून मिळालेले शब्दातीत समाधान, मुलांना कवटाळताना स्वतःच्या भावना रोखू न शकणारे नातेवाईक... असा भावभावनांचा कल्लोळ मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने कदाचित पहिल्यांदाच अनुभवला असेल. युक्रेनहून २१९ भारतीय मुलांना घेऊन आलेले विमान प्रत्येकाच्या घरात दिवाळी साजरी करून गेले. हतबल झालेल्या मातापित्यांनी गेल्या तीन दिवसापासून सुरू केलेला देव, अल्ला, गॉड यांचा धावा कामी आला, अशाच भावना प्रत्येकाच्या चेहर्यावर ओसंडून वाहत होत्या.
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे तेथील नागरिक सुरक्षित जागी स्थलांतरित करण्यासाठी धडपड करीत आहेत. मात्र, हवाई मार्गिका बंद असल्यामुळे त्यांचे प्रयत्न असफल ठरत आहेत. अशा स्थितीत भारताने आपल्या नागरिकांना मदतीचा हात देत मायदेशी परतण्याचा मार्ग खुला करून दिला आहे. शनिवारी एअर इंडियाच्या विमानाने २१९ नागरिकांची पहिली तुकडी मुंबई विमानतळावर दाखल झाली. या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जणू पुनर्जन्म मिळाल्याचा आनंद होता. देशवासीयांचे आशीर्वाद पाठीशी असल्याने सुखरूप परतण्याचा विश्वास होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी मुंबईत दाखल झाल्यानंतर दिली.
कोल्हापूरची १९ वर्षीय आर्या चव्हाण ही दोन महिन्यांपूर्वी युक्रेनला एमबीबीएस शिकण्यासाठी गेली होती. डॉक्टर होऊन मायदेशी परतण्याचा संकल्प तिने केला होता. मात्र, दोन्ही देशांतील युद्धाने तिच्या स्वप्नांवर पाणी फेरले. ती भारतात सुखरूप परतली असली, तरी पुढील शिक्षणाची चिंता तिला सतावत आहे. यापुढे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू ठेवण्याचे आश्वासन बुकोविनियन विद्यापीठाने दिले आहे, असे तिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
रुमानियाची राजधानी
बुखारेस्ट येथून विशेष विमानाने हे नागरिक परतले. मुंबई तसेच महाराष्ट्रासह भारतातील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांसह सर्वच नागरिकांना परत आणण्यासाठी एअर इंडियाकडून आधी तीन विमाने धाडली जाणार होती. त्यातील एक विमान युद्ध सुरू होण्याच्या एक दिवस आधी दिल्लीत आले. पण दुसऱ्या विमानाला युद्धजन्य स्थितीमुळे युक्रेनच्या विमानतळावर उतरता आले नव्हते.
विमानतळावर केंद्र सरकारचे प्रतिनिधी या नात्याने वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी, तर राज्य सरकारकडून परिवहन मंत्री ॲड. अनिल परब आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी विद्यार्थी प्रवाशांचे स्वागत केले. याखेरीज खासदार पूनम महाजन, आमदार अतुल भायखलकर व उपमहापौर सुहास वाडकर हेदेखील उपस्थित होते.
२० किमी पायी प्रवास : हर्षद व सीमा रणशेवरे यांचा मुलगा आणि मुलगी दोघेही युद्धभूमीत अडकले आहेत. मुलगी कश्मिरा ही दोन वर्षांपासून तिथे आहे. तर मुलगा आदित्य तीन महिन्यांपूर्वी तिथे गेला. दोघेही तेथे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. मुलगी कशीबशी रुमानिया सीमेवर पोहोचल्याने विमानाने येऊ शकली. पण मुलगा कसा येणार याची त्यांना चिंता आहे. मुलगा २० किमी पायपीट करीत पोलंड सीमेवर पोहोचला, असे त्यांना कळले आहे.