Join us

Russia Ukraine War: रेल्वेही धावली मदतीला, युक्रेनमधून येणाऱ्यांसाठी मुंबई विमानतळावरच 'रिझर्व्हेशन डेस्क'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2022 7:32 PM

भारतीय रेल्वेनेही मुंबईत उतरणाऱ्या युक्रेनमधील येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी, नागरिकांसाठी रिझर्व्हेशन आणि मदत डेस्क सुरू केला आहे

मुंबई - रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी अडकले आहेत. त्यांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारनं ऑपरेशन गंगाची (Operation Ganga) सुरुवात केली आहे. आता ही मोहीम अधिक जलदगतीनं राबवण्यासाटी मोदी सरकारमधील चार मंत्री युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये पोहोचण्याची जबाबदारी दिली आहे. युक्रेनशेजारील देशांमधून या विमानांचे उड्डाण होत असून राजधानी दिल्ली आणि मुंबईत विद्यार्थी उतरत आहेत. केंद्र सरकारकडून या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्याची सोय करण्यात येत आहे. 

भारतीय रेल्वेनेही मुंबईत उतरणाऱ्या युक्रेनमधील येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी, नागरिकांसाठी रिझर्व्हेशन आणि मदत डेस्क सुरू केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. विमानतळावरील टर्मिनल 2 लेव्हल पी4 गेट नंबर 4 येथे मदत कक्ष स्थापन करण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गावी, राज्यात जायचं आहे, त्यांना येथून विशेष रिझर्व्हेशन देण्यात येईल. रेल्वेने पुढाकार घेत मायदेशी विद्यार्थ्यांना धीर देण्याचं काम या मदत कक्षातून होत आहे.  राजधानी दिल्लीतही महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांची मोफत सोय महाराष्ट्र सदन येथे करण्यात आली आहे. महाराष्ट्र सदन येथील युक्रेनमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांची राहण्याची, जेवणाची सोय करण्यात आली असून महाराष्ट्रात परतण्यासाठीही व्यवस्था करण्यात येत आहे.  

या 4 मंत्र्यांवर जबाबदारी

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य शिंदे, किरण रिजिजू आणि जनरल व्ही.के.सिंह हे युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी समन्वय कार्यासाठी हजर आहेत. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारीही आपात्कालीन बैठक बोलावली होती. यादरम्यान, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि विदेश सचिव हर्षवर्धन श्रृंगला उपस्थित होते. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांना त्या ठिकाणाहून बाहेर काढणं हे आपलं प्राधान्य असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं होतं.

टॅग्स :युक्रेन आणि रशियाभारतीय रेल्वेविमानतळमुंबई