मुंबई - नेहरूंचा मार्ग आधीच स्वीकारला असता व राजकारण बाजूला ठेवून सर्व पक्षांशी मसलत केली असती तर युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचा आक्रोश नक्कीच कमी करता आला असता, पण सांगायचे कोणी? जे जे होईल ते पाहत राहणे एवढेच हाती उरले आहे. आता तर युक्रेनमधील खारकीव या शहरावर रशियाने मंगळवारी केलेल्या हल्ल्यात एका हिंदुस्थानी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या विद्यार्थ्याच्या दुर्दैवी मृत्यूची जबाबदारी केंद्र सरकारलाच घ्यावी लागेल अशी टीका सामना अग्रलेखातून शिवसेनेने(Shivsena) भाजपा(BJP) आणि केंद्र सरकारवर केली आहे.
तसेच युक्रेनच्या युद्धभूमीवर असे अनेक विद्यार्थी आज मृत्यूच्या छायेत आहेत. या मुलांची लवकरात लवकर सुटका व्हावी, एवढीच अपेक्षा आहे. चार मंत्री उडाले आहेत. ते विचाराने मंगळावर पोहोचले, पण मुले युक्रेनच्या सीमेवर आहेत. केंद्र सरकार उत्तर प्रदेशसह चार राज्यांत निवडणूक प्रचारात गुंतून पडल्याने हजारो मुलांच्या त्रासाला पारावार राहिलेला नाही. आता संताप आणि आक्रोश यांचा बांध फुटल्याने केंद्राने हरदीपसिंग पुरी, ज्योतिरादित्य शिंदे, किरण रिजुजी आणि व्ही. के. सिंह या चार मंत्र्यांना ‘विशेष दूत’ म्हणून पाठवले आहे असंही शिवसेनेने म्हटलं आहे.
सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे
युक्रेनमध्ये अडकलेल्या हिंदुस्थानींना परत आणण्यासाठी चार मंत्री तिकडे रवाना झाले आहेत. शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेले विद्यार्थी युक्रेनच्या अनेक भागांत अडकून पडले आहेत. बंकर्स, गोदामात आणि पोलंड, हंगेरी, रुमानिया, सोव्हिएत रिपब्लिक या देशांच्या सीमांवर ही पोरे अडकून पडली आहेत.
पोलंडच्या सीमेवर तर हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना युक्रेनच्या सुरक्षा दलाने मारहाण केल्याचे व्हिडीओ समोर आले. या मुलांचे पैसे, खाण्याचे जिन्नस संपले आहेत. कडाक्याची थंडी, बर्फवृष्टी अशा वातावरणात ही पोरे युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी धडपडत आहेत
जनरल व्ही. के. सिंह यांना अशा कामाचा अनुभव आहे. जनरल सिंह हे म्हणाले आहेत की, ‘‘चिंतेचे कारण नाही. कुणी हिंदुस्थानी मंगळावर अडकला असला तरी त्याची सुटका करू.’’ सिंह यांचे हे बडबोलेपण आहे. कुलदीप जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात अडकून पडले आहेत. त्यांच्या सुटकेचे काय? असा प्रश्न त्यांना कुणीतरी विचारायला हवा.
पोलंडच्या सीमेवर अडकून पडलेल्या कानपूरच्या एका मुलीने व्हिडीओद्वारे आक्रोश व्यक्त केला तो अस्वस्थ करणारा आहे. ‘‘हिंदुस्थान सरकारने आमच्यासाठी काहीच केले नाही. युक्रेनमध्ये अमेरिकेचा एकही नागरिक अडकलेला नाही. कारण त्यांच्या प्रशासनाने युद्ध सुरू होण्यापूर्वीच आपल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. हिंदुस्थानी सरकारला हे का सुचले नाही?’’ हा त्या मुलीचा प्रश्न आहे.
रशिया आणि युक्रेनवर युद्धाचे ढग जमा होत असताना व प्रत्यक्ष युद्ध सुरू झाल्यावरही पंतप्रधान, संरक्षणमंत्री, गृहमंत्री हे उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपुरातील प्रचारात गुंतून पडले. आताही आक्रोश वाढला हे लक्षात येताच प्रचार दौरा थांबवून ते दिल्लीत उच्चस्तरीय बैठकीसाठी आले.
निवडणुका पक्षाने लढवायच्या असतात. पंतप्रधान किंवा देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी नाही! खासकरून महायुद्धाचे संकट खदखदत आहे व त्यात स्वदेशातील जनता कुठेतरी अडकून पडली आहे, मदतीची याचना करीत आहे. अशा वेळी राजकारण, सत्ताकारण बाजूला ठेवून केंद्रीय राज्यकर्त्यांनी त्यागभावनेने पुढे यायला हवे.
पण युक्रेनमधल्या आक्रोशापेक्षा राज्यकर्त्यांना राजकीय प्रचार सभा, रोड शो वगैरेंचे महत्त्व वाटत असेल तर जनता निराधार आणि वाऱ्यावर आहे हे मान्य करायला हवे. हिंदुस्थानी विद्यार्थी युक्रेनच्या चारही सीमारेषांवर अडकले आहेत व सीमावर्ती भागातील राष्ट्रांत हिंदुस्थानी वकिलाती किंवा विदेश मंत्रालयाची यंत्रणा नाही. त्यामुळे या मुलांना रस्त्याने, रेल्वेने दुसऱ्या देशात जाण्याच्या अडचणी वाढल्या आहेत.
दुसरे असे की, नागरी विमान वाहतूक मंत्री शिंदे विशेष दूत म्हणून जात आहेत, पण त्यांच्या खात्याचे स्वतःचे एक विमानही नाही. एअर इंडियाही विकले. त्यामुळे इंडिगो, स्पाइस जेट, गो एअरसारख्या खासगी विमान कंपन्यांवरच अवलंबून राहावे लागते. युक्रेनमधून बाहेर पडण्याचा आणखी एक रस्ता मोल्दोवातून सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मुलांना मोल्दोवामार्गे बाहेर काढून मग रोमानियाच्या रस्त्याने आणले जाईल. हिंदुस्थानी दूतावासाने त्या देशांच्या सीमांवर बसेस वगैरेंची व्यवस्था केली आहे. युक्रेनमधून आतापर्यंत आठ हजार लोकांना बाहेर काढले, पण हिंदुस्थानात त्यातले 1400 लोकच पोहोचू शकले आहेत.
हिंदुस्थानी दूतावास या विद्यार्थ्यांना एकदा सांगतो, कीवमध्ये आहात तिथेच थांबा, तुम्हाला तेथून सुरक्षित युक्रेनबाहेर काढले जाईल. आणि त्यानंतर काही तासांत हाच दूतावास सांगतो की, सात तासांत कीव या शहरातून बाहेर पडा. हे काय चालले आहे? एक काहीतरी ठरवा. हिंदुस्थानी दूतावासाचाच एवढा गोंधळ असेल तर युक्रेनमधील आपले भयग्रस्त विद्यार्थी, इतर नागरिक यांनी काय करायचे?
पुन्हा केंद्र सरकारने या सगळय़ा कार्यक्रमास ‘ऑपरेशन गंगा’ असे नाव देऊन उत्तर प्रदेश निवडणूक प्रचारातही या सरकारी मोहिमेचा वापर करून घेतला. म्हणजे काही झाले तरी राजकीय प्रचाराचा किडा हा डोक्यात वळवळतो आहेच.
बिहारमध्ये निवडणुका असत्या तर ‘ऑपरेशन नालंदा’ म्हटले असते. महाराष्ट्रात यादरम्यान निवडणुका असत्या तर ‘ऑपरेशन रायगड’ किंवा ‘ऑपरेशन सह्याद्री’ म्हटले असते. गुजरातमध्ये निवडणुका असत्या तर ‘ऑपरेशन सोमनाथ’ म्हटले असते. या सगळय़ांची आता देशाला सवय झाली आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे व घुसवायचे हे आता ठरूनच गेले आहे.
त्याला आता इलाज नाही. परिस्थिती अत्यंत कठीण आणि मुश्कील असल्याचे हिंदुस्थानातील युक्रेनचे राजदूत इगोर पोलिखा यांनी सांगितले आहे. युद्ध आता अणुयुद्धाकडे सरकत आहे व दोन देशांतील चर्चा फिस्कटल्या आहेत. युक्रेनमधील रस्त्यारस्त्यांवर गोळीबार सुरू आहे व आतापर्यंत 5300 रशियन सैनिक मारले गेल्याचा दावा युक्रेनने केला आहे.