मुंबईत रशियन महिलेशी भर रस्त्यात छेडछाड, पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 09:55 AM2017-11-07T09:55:40+5:302017-11-07T10:00:26+5:30
बोरीवली भागात राहणाऱ्या एका रशियन महिलेशी भर रस्त्यात छेडछाड केल्याची घटना समोर आली आहे.
मुंबई- बोरीवली भागात राहणाऱ्या एका रशियन महिलेशी भर रस्त्यात छेडछाड केल्याची घटना समोर आली आहे. 1 नोव्हेंबर रोजी ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. रशियन महिला रिक्षेतून उतरून तिच्या घरी चालली होती. त्यावेळी रस्त्यावर असणाऱ्या काही लोकांनी तिच्याशी छेडछाड केली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. आजतकने हे वृत्त दिलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोरीवली भागात राहणारी एक रशियन महिला 1 नोव्हेंबरच्या रात्री दहा वाजता रिक्षेने तिच्या घरी चालली होती. घराजवळील रस्त्यावर उतरून ती चालत घरी निघाली. त्यावेळी रस्त्यात असणाऱ्या एका व्यक्तीने तिच्याकडे पाहून अपशब्द वापरले. त्या व्यक्तीच्या अपशब्दांकडे दुर्लक्ष करत ती पुढे चालत होती. तेव्हा आरोपीने त्या तरूणाला पकडून बळजबरी करायला सुरूवात केली. पीडित मुलीने आरडाओरडा करायला सुरूवात केल्यावर आजूबाजूची लोक तिथे आली. त्यांनी आरोपींना पडकण्याचा प्रयत्न केला पण आरोपींनी तिथून पळ काढला होता. घटनेच्या तीन दिवसांनंतर पीडित मुलीने एमएचबी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून घटनास्थळाजवळ असणाऱ्या सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जातो आहे.
विदेशातून येणाऱ्या महिलांबरोबर अशा प्रकारच्या घटना याआधीही घडल्या आहेत.याआधीही रशियन महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. उत्तर प्रदेशच्या मथुरामध्ये एका बँक व्यवस्थापकाला रशियन महिलेवर बलात्काराच्या आरोपात अटक करण्यात आली. आरोपी महेंद्र प्रसाद सिंह युको बँकेच्या वृंदावन शाखेचे व्यवस्थापक आहेत.पीडित तरूणी 2016 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून महेंद्रच्या संपर्कात आली होती.
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात पीएचडी करणाऱ्या एका जर्मन महिलेसमोर सार्वजनिक ठिकाणी हस्तमैथून करणाऱ्या 32 वर्षीय पुरूषाला अटक करण्यात आली होती. त्या महिलेने आरोपीच्या कारचा फोटो काढला होता. त्याच फोटोच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली.