Join us

ग्रामीण भागातील शेकोटी संस्कृती हद्दपार!

By admin | Published: December 04, 2014 11:47 PM

आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा... हे गाणे गुणगुणायला नुकतीच थंडी सुरू झाली आहे. या काळात आजीआजोबांसह बच्चेकंपनीला शेकोटीची अ

बोर्डी : आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा... हे गाणे गुणगुणायला नुकतीच थंडी सुरू झाली आहे. या काळात आजीआजोबांसह बच्चेकंपनीला शेकोटीची अन् मायेची ऊब अनुभवायची मजा काही वेगळीच. मात्र, काळाच्या ओघात ग्रामीण भागातून शेकोटी संस्कृती हद्दपार झालेली दिसत आहे. उलट मुलांनी शेकोटी पेटवणे, हा उपद्व्याप ठरत असून जखमी होण्याचे छोटे-मोठे अपघात घडत आहेत. डहाणू तालुक्यातील चिखले गावची कार्तिका मनोहर पाटील ही पाचवीत शिकणारी विद्यार्थिनी दोन दिवसांपूर्वी छोट्या बहिणीसह शेकोटीजवळ बसली होती. आगीशी खेळताना तिच्या उजव्या डोळ्यावर विस्तवाचे इंगळ पडले. दैव बलवत्तर असल्याने डोळा थोडक्यात बचावला. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.या वर्षी डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत चांगली थंडी पडेल, असा विश्वास प्रख्यात खगोलशास्त्र अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी लोकमतजवळ व्यक्त केला आहे. त्यानुसार, थंडी दाखल झाली आहे. सकाळ-संध्याकाळी गारव्यासह धूसर धुक्याची चादर दृष्टीस पडत आहे. थंडी म्हटले की, शेकोटी ओघानेच आली. पूर्वी ग्रामीण भागात थंडीच्या दिवसांत ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसायच्या. आजीआजोबा आणि वडीलधाऱ्यांसोबत शेकोटीभोवती बसून लहान मुले शेकोटीची अन् मायेची ऊब अनुभवत असत. या वेळी गप्पागोष्टी, गाणी, ओव्या, अभंग, रुढी, परंपरा, वडीलधाऱ्यांचे जीवनानुभव इ.ची संस्कार शिदोरी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक पद्धतीने संक्रमित व्हायची.काही वर्षांपासून ग्रामीण भागात आधुनिकतेचा शिरकाव झाला आहे. जीवनपद्धतीत बदल, संयुक्त कुटुंब व्यवस्थेचा ऱ्हास आणि अमाप वृक्षतोड इ. घटकांमुळे शेकोटी संस्कृती हद्दपार झाली आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाअभावी शेकोटी पेटवताना शरीर भाजण्याचे छोटे-मोठे अपघात घडतात. (वार्ताहर)