लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरे सेना- काँग्रेस-राष्ट्रवादी महायुतीच्या ऋतुजा लटके व भाजप-शिंदे सेना-रिपाइंचे मुरजी पटेल यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत शुक्रवारी अर्ज भरले.
यावेळी पटेलांसोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर, आ. प्रवीण दरेकर, नितेश राणे आदी हजर होते. लटके यांच्यासोबत आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे दिलीप वळसे-पाटील, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप उपस्थित होते. २०१९ मध्ये मुरजी पटेल यांनी अपक्ष म्हणून ४५ हजार मते घेतली होती. सेनेच्या रमेश लटके यांचा १५ हजार मतांनी विजय झाला होता.
असे आहे राजकीय चित्र
- मतदारसंघात १ लाख ५ हजार मराठी, ५८ हजार उत्तर भारतीय, ३८ हजार मुस्लीम, ३३ हजार गुजराती, १९ हजार दाक्षिणात्य आणि १४ हजार ख्रिश्चन मतदार आहेत.
- महानगरपालिकेचे ८ प्रभाग आहेत. यातील ५ प्रभागात उद्धव ठाकरे गटाचे असून, दोन भाजपचे व एक काँग्रेसचा नगरसेवक आहे.
- संभाजी ब्रिगेडने ऋतुजा लटके यांना पाठिंबा दिला आहे. तसे पत्र ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी पाठवले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"