ऋतुजा लटके यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट!
By मनोहर कुंभेजकर | Published: October 13, 2022 07:43 PM2022-10-13T19:43:30+5:302022-10-13T19:43:49+5:30
ऋतुजा लटके यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
मुंबई : ऋतुजा रमेश लटके यांनी दिलेला पालिकेच्या नोकरीचा राजीनामा स्वीकारल्याचे पत्र त्यांना शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत द्या असे आदेश आज मुंबई महानगर पालिकेला दिले आहे. या आदेशाने ऋतुजा लटके यांचा अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील येत्या दि,3 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुक लढवण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. आज न्यायालयात विजय मिळाल्याने आनंदीत झालेल्या ऋतुजा लटके यांनी विभागप्रमुख-आमदार अनिल परब यांच्या उपस्थितीत सायंकाळी ५ वाजता मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
यावेळी अमेय रमेश लटके, उपविभागप्रमुख अनिल खांडेकर, माजी नगरसेवक संदीप नाईक,विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर समन्वयक व इतर
मान्यवर उपस्थित होते. ऋतुजा लटके म्हणाल्या की, आज मला न्यायदेवतेने न्याय दिला आहे. मी पतीचा वारसा पुढे घेवून जाणार आहे. कोर्टाने उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत राजीनामा स्वीकारल्याचे पत्र देण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत. पत्र मिळाल्यावर मी उमेदवारी अर्ज भरणार आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर सत्याचा विजय होतो व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद ज्यांच्या पाठीशी आहे त्यांना घाबरण्याचे कारण नाही. खोटं जास्त दिवस टिकत नाहीत, माझी बाजू सत्य होती व ती मान्य केल्याबद्दल कोर्टाचे मी आभार व्यक्त करते.
उद्धव ठाकरे म्हणाले की, कोर्टाचा निर्णय आपल्या बाजूने येईल व विजय होणार हे पक्कं मला माहिती होतं, कारण न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे. किती जरी खोटं केलं सत्याची बाजू सोडायची नाही ही शिकवण आपल्याला बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली आहे आता जोमाने कामाला लागा आणि या पोटनिवडणूकीत विजयी होऊन पुन्हा मातोश्रीवर या असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.