ऋतुजा लटके उद्या सकाळी निवडणूक अर्ज भरणार; महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित राहणार
By मनोहर कुंभेजकर | Published: October 13, 2022 08:46 PM2022-10-13T20:46:22+5:302022-10-13T20:46:35+5:30
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अंधेरी पूर्व गणेश मंदिर, मालपा डोंगरी येथून ९.३० वाजता भव्य मिरवणूक निघणार आहे.
मुंबई- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार ऋतुजा लटके यांनी दिलेला पालिकेच्या नोकरीचा राजीनामा स्वीकारल्याचे पत्र त्यांना शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत द्या, असे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगर पालिकेला दिले आहे. या आदेशाने ऋतुजा लटके यांचा अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील येत्या पोटनिवडणूक लढवण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार ऋतुजा रमेश लटके उद्या म्हणजेच शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता अंधेरी (पूर्व ) गुंदवली मनपा शाळेत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्याआधी सदर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अंधेरी पूर्व गणेश मंदिर, मालपा डोंगरी येथून ९.३० वाजता मिरवणूक फेरीस सुरुवात होईल.
यावेळी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते व माजी मंत्री सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, कॉंग्रेस नेते व माजी मंत्री सुरेश शेट्टी, विभागप्रमुख व माजी मंत्री अॅड. अनिल परब, शिवसेना विभागप्रमुख तथा माजी मंत्री शिवसेना सचिव अनिल देसाई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी महाआघाडीचे इतर नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.