मुंबई - ऋतुजा लटके यांनी दिलेला नोकरीचा राजीनामा स्वीकारून राजीनामा स्वीकारल्याचे पत्र त्यांना शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत द्या असे आदेश मुंबई हायकोर्टाने आज मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत. या आदेशांमुळे ऋतुजा लटके यांचा अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोर्टाने आपल्या बाजूने निकाल दिल्यानंतर ऋतुजा लटके यांनी कोर्टाचे आभार मानले असून, न्यायदेवनेते मला न्याय दिला आहे, अशी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
कोर्टाचा निकाल आल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ऋतुजा लटके म्हणाल्या की,आज न्यायदेवतेकडून मला न्याय मिळाला. मी पतीचा वारसा पुढे घेऊन जाणार आहे. कोर्टाने उद्या सकाळी ११ वाजेपर्यत राजीनामा स्वीकारल्याचे पत्र देण्याचे आदेश दिले आहेत, हे पत्र मिळाल्यावर मी उमेदवारी अर्ज दाखल करेन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून मशाल या चिन्हावर मी निवडणूक लढवणार आहे. माझं चिन्ह नवीन असलं तरी माझी माणसं जुनी आहेत, असे ऋतुजा लटके यांनी म्हटले आहे.
शिवसेनेचे अंधेरी पूर्व मतदारसंघातील आमदार रमेश लटके यांचे मे महिन्यात अकाली निधन झाले होते. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली होती. दरम्यान, या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र निवडणूक लढवण्यासाठी लटके यांनी दिलेला मुंबई महानगरपालिकेतील नोकरीचा राजीनामा पालिका प्रशासनाने स्वीकारला नव्हता. त्याविरोधात ऋतुजा लटके यांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेला दिले होते. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा ऋतुजा लटके यांचा मार्ग मोकळा झाला होता.