रायन इंटरनॅशनल स्कूल हत्याप्रकरण : विश्वस्तांना उच्च न्यायालयाचा दिलासा, अटकेपासून तात्पुरते संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 05:21 AM2017-09-13T05:21:46+5:302017-09-13T05:21:46+5:30
गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील सात वर्षांच्या विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी समूह संस्थापक आॅगस्टाईन पिंटो आणि समूहाच्या व्यवस्थापकीय संचालक ग्रेस पिंटो यांना उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलास देत, बुधवारपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे.
मुंबई : गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील सात वर्षांच्या विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी समूह संस्थापक आॅगस्टाईन पिंटो आणि समूहाच्या व्यवस्थापकीय संचालक ग्रेस पिंटो यांना उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलास देत, बुधवारपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे.
आॅगस्टाईन पिंटो (७३) आणि ग्रेस पिंटो (६२) यांच्या ट्रान्झिट जामीन अर्जाला सकरारी वकील अरुणा पै-कामत यांनी विरोध केला. ट्रान्झिट जामिनासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निकाल उच्च न्यायालयात सादर करायचे असल्याने, अरुणा पै- कामत यांनी बुधवारपर्यंत सुनावणी तहकूब करण्याची विनंती न्या. अजय गडकरी यांना केली. न्यायालयाने ती मान्य करत, आॅगस्टाईन व ग्रेस यांना बुधवारपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. ही केस केवळ ट्रान्झिट जामिनाची आहे. आरोपीला संबंधित न्यायालयात जाऊन अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करू द्या, असे म्हणत, न्या. गडकरी यांनी रायन पिंटो यांचा ट्रान्झिट जामीन मंजूर केला, तर आॅगस्टाईन व ग्रेस पिंटो या त्यांच्या आईवडिलांना एक दिवसाचा अंतरिम दिलासा दिला.
शाळा समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रायन पिंटोही ट्रान्झिट जामिनासाठी अर्ज करणार असल्याचे पिंटो कुुटुंबीयांचे वकील नितीन प्रधान यांनी सांगितले. प्रद्युम्न ठाकूर या विद्यार्थ्याच्या हत्येमुळे गुरुग्राममध्ये झालेल्या हिंसक आंदोलनानंतर, पिंटो यांच्या वतीने अॅड. नितीन प्रधान यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली. संतप्त पालकांनी गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल स्कूलजवळील, दारूच्या दुकानांची तोडफोड करत, शाळा व्यवस्थापनाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर, प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी बस कंडक्टरला अटक केली, तसेच रायन समूहाचे दोन वरिष्ठ अधिकारी फ्रँसिस थॉमस व जेयस थॉमस यांना अटक केली.
याचिकेवर आज सुनावणी
हरयाणाचे शिक्षणमंत्री राम बिलास शर्मा यांनी, गुरुग्राम पोलिसांना प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणी रायन ग्रुपच्या वरिष्ठ अधिकाºयांवरही गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे आॅगस्टाईन पिंटो आणि ग्रेस पिंटो यांनी, उच्च न्यायालयात ट्रान्झिट जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. त्यांच्या याचिकेवर बुधावरी सुनावणी होणार आहे.
हरयाणात अर्ज करा : अॅड. गुणरतन सदावर्ते यांनी आंबेडकर
विद्यार्थी संघटना आणि पालकांच्या एका गटातर्फे रायन यांच्या जामीन अर्जात मध्यस्थी करत, त्यांच्या जामिनाला विरोध केला. मात्र, न्या. गडकरी यांनीच या मध्यस्थी अर्जावर आक्षेप घेतला. ‘जर तुम्हाला मध्यस्थी याचिका करायची असेल, तर हरयाणाला जाऊन तेथील न्यायालयात तुमचा अर्ज दाखल करा,’ असे न्या. गडकरी यांनी सांगितले.