रायन इंटरनॅशनल ठरले विजेते

By admin | Published: December 8, 2015 01:09 AM2015-12-08T01:09:05+5:302015-12-08T01:09:05+5:30

प्रथमच मुंबई महापौर चषक क्रीडा स्पर्धा अंतर्गत झालेल्या आंतरशालेय - महाविद्यालय पिकलबॉल स्पर्धेत गोरेगावच्या रायन इंटरनॅशनल स्कूलने सांघिक विजेतेपदावर कब्जा केला

Ryan International winners | रायन इंटरनॅशनल ठरले विजेते

रायन इंटरनॅशनल ठरले विजेते

Next

मुंबई : प्रथमच मुंबई महापौर चषक क्रीडा स्पर्धा अंतर्गत झालेल्या आंतरशालेय - महाविद्यालय पिकलबॉल स्पर्धेत गोरेगावच्या रायन इंटरनॅशनल स्कूलने सांघिक विजेतेपदावर कब्जा केला. त्याचवेळी मुलांच्या एकेरी गटात अपेक्षित वर्चस्व राहिले ते जमनाबाई नरसी स्कूलचे. मात्र या गटात धक्कादायक निकाल लागला. संभाव्य विजेत्या व नुकताच स्पेनमध्ये झालेल्या स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या शनय मेहताला कथन गांधी याने २-० असा धक्का देत खळबळ माजवली, तर मुलींच्या गटात रायनच्या तन्विता ठाकूरने बाजी मारली.
मुंबई महापालिकेच्या मान्यतेने आणि अखिल भारतीय पिकलबॉल संघटना (आयपा) व मुंबई उपनगर जिल्हा पिकलबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच अंधेरी येथील शहाजीराजे क्रीडा संकुलामध्ये मुंबई जिल्हा महापौर चषक पिकलबॉल स्पर्धा पार पडली. १९ वर्षांखालील शालेय व महाविद्यालयीन खेळाडूंसाठी झालेल्या या स्पर्धेत एकूण ३६ संघांनी सहभागी घेतला. या वेळी रायन स्कूलने सर्वाधिक १७ गुणांची कमाई करताना सांघिक विजेतेपद पटकावून पहिल्या मुंबई महापौर पिकलबॉल चषकावर आपले नाव कोरले.
स्पर्धेत मुलांचा एकेरी अंतिम सामना सर्वात लक्षवेधी व सनसनाटी ठरला. बलाढ्य शनयचे विजेतेपद सुरुवातीपासून गृहीत धरले जात होते. त्याप्रमाणे त्याने सुरुवातही केली. मात्र अंतिम सामन्यात त्याच्याच शाळेच्या कथनने शनयचे विजेतेपद हिसकावून घेतले. कथनने सुरुवातीपासून आघाडी घेताना शनयवर दडपण टाकले. यामुळे शनयकडून काही चुका होऊ लागल्या आणि शेवटपर्यंत तो त्यातून सावरला नाही. याचा पुरेपूर फायदा घेत कथनने ११-४, ११-२ अशा गुणांनी विजेतेपदावर कब्जा केला. मुलींच्या तीन सेटपर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात रायनच्या तन्विताने बलाढ्य डहाणूकर कॉलेजच्या स्वप्नाली आग्रेला नमवले. पहिला सेट जिंकून स्वप्नालीने आश्वासक सुरुवात केली. मात्र यानंतर तन्विताने सलग दोन सेट जिंकत १३-११, ११-६, ११-०८ विजेतेपदाला गवसणी घातली.
मुलांच्या दुहेरी गटात साहिल सूर्यवंशी - साहिल खंडागळे या परांजपे विद्यालयाच्या (अंधेरी) जोडीने विजेतेपद निश्चित करताना दीक्षित रोड स्कूलच्या (विलेपार्ले) विनायक बेलेकर-संकेश तरळ यांचा ११-८, ११-९ असा धुव्वा उडवला. त्याचवेळी मुलींच्या दुहेरी गटात संमित्र विद्यामंदिरच्या (गोरेगाव) ईशा सकपाळ - भक्ती आडीवरेकर या जोडीने ईशिता सिंग - पलक भंडारी या रायन स्कूलच्या जोडीचा ११-२, ११-५ असा फडशा पाडला.

Web Title: Ryan International winners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.