Join us  

स.. सरस्वतीचा, ल.. लगोरीचा! संग्रहालयाशी नाते जोडण्यासाठी चिमुकल्यांसाठी नवी बाराखडी

By स्नेहा मोरे | Published: December 08, 2023 6:43 PM

वेगाने वाढणाऱ्या तंत्रज्ञानाच्या काळात लहानग्यांचे नाते संग्रहालयाशी टिकून राहावे यासाठी कुलाबा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.

मुंबई : वेगाने वाढणाऱ्या तंत्रज्ञानाच्या काळात लहानग्यांचे नाते संग्रहालयाशी टिकून राहावे यासाठी कुलाबा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. त्याचाच भाग म्हणून या वस्तुसंग्रहालयाने आता बालदोस्तांसाठी संग्रहालयाशी नाते जोडण्यासाठी नवीन बाराखडी तयार केली आहे. या वैशिष्ट्यपूर्ण बाराखडीच्या माध्यमातून लहानग्यांना संग्रहालयातील ऐतिहासिक खजिन्याच्या मदतीने मराठी स्वर, व्यंजनाचे धडे गिरवण्यास मदत होणार आहे. संग्रहालयाशी चिमुरड्यांचे नाते अधिकाधिक घट्ट व्हावे आणि त्यामुळे चिमुरड्यांनी संग्रहालयाकडे वळावे या उद्देशाने ही बाराखडी आता राज्याच्या कानाकोऱ्यातील शहरी आणि ग्रामीण भागात पोहोचविण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या मनीषा नेने यांची ही संकल्पना असून, बाराखडीची मांडणी स्मिता पार्टे यांनी केली आहे, तर या प्रकल्पाच्या चमूमध्ये वंदना प्रपन्ना, राकेश यादव, सतता मोंडल आणि स्नेहा मेस्त्री सदस्यांनी काम केले आहे. वस्तुसंग्रहालयातील कला संग्रहावर आधारित या बाराखडीत वेगवेगळ्या कलाकृती, शिल्प, चित्र यांचा संदर्भ स्वर आणि व्यंजनांंशी जोडलेला आहे.

या प्रकल्पाच्या संकल्पनेनंतर मराठी भाषेतील स्वर, व्यंजनांप्रमाणे संग्रहालयातील कला संग्रहालयाचा शोध घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे, कधी कधी एखादा स्वराशी निगडित एकच वस्तू वा कधीतरी एखाद्या व्यंजनाशी अनेक वस्तू संदर्भित असलेल्या दिसून आल्या. त्यातून लहानग्यांना आकलनासाठी सोपे व्हावे या हेतूने कला संग्रहातील वस्तू निश्चित करण्यात आल्या. त्यानंतर त्यांची मांडणी आणि चित्र स्वरूपावर काम केले. एकाच वेळी अचूक माहिती, आकर्षक चित्र आणि संग्रहालयाविषयीही उत्सुकता वाढावी अशा पद्धतीने ही बाराखडी डिझाइन करण्यात आल्याची माहिती संग्रहालयाच्या संचालक मनीषा नेने यांनी दिली आहे.

ग्रामीण भागांतही पोहोचविणार

देश-विदेशातून संग्रहालयात पर्यटकांसह अभ्यासक, विद्यार्थी भेटीस येतात. त्यामुळे या नवीन बाराखडीची संकल्पना सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात येणार आहे. जेणेकरून, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरही हा प्रयोग पोहोचवा. तसेच, राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरत्या संग्रहालयाच्या माध्यमातून ही बाराखडी पोहोचविण्यात येणार आहे. जेणेकरून, लहानग्यांमध्ये वस्तुसंग्रहालयाबाबत उत्सुकता आणि कुतूहल वाढावे हा उद्देश आहे.

- मनीषा नेने, संचालक, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय