मुंबईत नियंत्रणात येत असलेली काेराेनास्थिती पाहून निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बेस्ट उपक्रमासाठी एस.टी. महामंडळाने बस तसेच चालक व वाहक उपलब्ध करून दिल्यानंतर आता मुंबईत नियंत्रणात येत असलेली असणारी कोरोनास्थिती पाहता एस. टी. गाड्यांची संख्या ५०० वरून २५० गाड्या एवढी कमी करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने आणखी गाड्या कमी करून बेस्ट वाहतूक बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
बेस्टच्या सेवेसाठी असलेल्या एस.टी.वर चालक, वाहकांची नियुक्ती एस.टी. महामंडळाकडून केली जाते. मुंबईबाहेरूनच एस.टी. चालक, वाहकांना एक ते दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी बोलावले जाते. त्या कर्मचाऱ्यांचा कालावधी संपला की दुसऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. या कर्मचाऱ्यांना सप्टेंबर २०२० पासूनच गैरसोयींचा सामना करावा लागत हाेता. राज्यातील विविध भागांतून मुंबईत बेस्ट सेवेसाठी आलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली.
कोरोनाकाळात बेस्टच्या बसगाड्यांना प्रचंड गर्दी होऊ लागल्याने अंतराचे नियम पायदळी तुडवले गेले. त्याशिवाय कमी पडणाऱ्या गाड्या आणि वाहतूक कोंडी यांमुळे बेस्ट थांब्यांवर प्रवासी बसची तासन्तास वाट पाहू लागले. त्यामुळे २४ सप्टेंबर २०२० पासून बेस्टच्या मदतीला मुंबईबाहेरून टप्प्याटप्प्यांत एक हजार एस.टी. गाड्या दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. बेस्ट उपक्रमाने एस.टी. गाड्या दर किलोमीटरमागे ७५ रुपये भाडेदराने घेतल्या आणि या एस.टी. मुंबईतील कानाकोपऱ्यात धावू लागल्या. परंतु जून २०२० पासून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी सुरू झालेल्या लोकलमधून हळूहळू विविध श्रेणींतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची परवानगी दिली. परिणामी बेस्टच्या ताफ्यातील एस.टी. बसची संख्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि जानेवारी २०२१ पर्यंत एक हजारपैकी टप्प्याटप्प्यांत ५०० एस.टी. काढून घेण्यात आल्या. आता ५०० एस.टी. गाड्या धावत आहेत. मात्र आता त्यांतील आणखी २५० गाड्या कमी करण्यात आल्या आहेत.
........................................