एस. टी. महामंडळाला आर्थिक पॅकेज द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:08 AM2021-05-05T04:08:44+5:302021-05-05T04:08:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन जाहीर केले असून, त्याचा फटका एस. टी. महामंडळालाही बसला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन जाहीर केले असून, त्याचा फटका एस. टी. महामंडळालाही बसला आहे. गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये एस. टी. कामगारांना त्यांचे वेतन मिळण्यास आलेल्या अडचणी पुन्हा येऊ नयेत, यासाठी शासनाने एस. टी. कर्मचाऱ्यांना पुढील सहा महिन्यांपर्यंतचे वेतन नियमित व वेळीच मिळण्यासाठी महामंडळाला भरीव आर्थिक मदत करण्याची मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदनसुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना संघटनेकडून देण्यात आले आहे.
महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले की, कोरोना काळात काम करताना आतापर्यंत ७ हजार ५०० कर्मचारी बाधित झाले असून, १९८ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एस. टी. कर्मचारी अक्षरश: जिवावर उदार होऊन आपली सेवा बजावत आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचे वेतन व इतर आर्थिक बाबी वेळेत मिळणे आवश्यक आहे. एस. टी. महामंडळ प्रचंड आर्थिक अडचणीत असल्यामुळे महामंडळाने कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर खर्चासाठी शासनाकडे दोन हजार कोटींची मागणी केल्याचे समजते. म्हणजेच भविष्यात एस. टी. कर्मचाऱ्यांना वेतन मिळणे अडचणीचे होणार आहे, असे दिसून येते. मागील लॉकडाऊनच्या कालावधीत एस. टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आपण पुढाकार घेऊन शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळवले होते. एवढेच नाही तर माहे मार्च २०२१पर्यंतच्या वेतनासाठी १ हजार कोटींचे विशेष पॅकेज महामंडळाला देऊन कर्मचाऱ्यांची आर्थिक अडचण दूर केलेली होती. मागील लॉकडाऊनच्या कालावधीत एस. टी. कामगारांना त्यांचे वेतन मिळण्यास आलेल्या अडचणी पुन्हा येऊ नयेत, यासाठी शासनाने एस. टी. कर्मचाऱ्यांना पुढील सहा महिन्यांपर्यंतचे वेतन नियमित व वेळीच मिळण्यासाठी महामंडळाला भरीव आर्थिक सहाय्य मिळवून देण्याची मागणी केल्याचे संदीप शिंदे म्हणाले.
कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी
कोरोनामुळे १९८ कर्मचारी मृत झाले असले, तरी फक्त ८ ते १० कर्मचाऱ्यांच्या वारसांनाच ५० लाखांचे विमा कवच मिळाले आहे. तसेच कोरोनामुळे मृत झालेल्या इतर कर्मचाऱ्यांच्या वारसांना अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाही व मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरीही मिळालेली नाही. तसेच वैद्यकीय बिलाची प्रतिपूर्तीही मिळत नाही. अशा अनेक आर्थिक संकटात कर्मचारी सापडलेला आहे. कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या एस. टी. कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ न देणे हे त्यांच्यावर अन्याय करणारे असून, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे.