या वर्षी विलक्षण नकारात्मकतेला भेदून सूर्याची ताजी किरो नव्याने येत्या वर्षाला देण्याचे आव्हान, प्रत्येक घराने, घरातील प्रत्येक माणसाने पेलले आहे. क्षेत्र कुठलेही असो, नवनिर्मितीच्या निर्झराने खडकातून वाट धुंडाळण्याचे साहस दाखवले आहे.
...........................
आपण अचानक नव्या दिवसाचा दरवाजा उघडतो आणि समोर कमरेवर हात ठेवून ‘आव्हान’ उभे ठाकलेले असते. सारे काही सुरळीत चाललेले असताना हे काय मध्येच? असे वाटून आपण गडबडतो, गोंधळतो, आता आपले कसे होणार? या धास्तीने धास्तावतो, पण मग यातून तर सहिसलामत सुटले पाहिजे, या जिद्दीने ऊर्जा एकवटून येते. मनगटातील बळ कळते, मनातील खंबीरता जाणवते, बघता बघता ते आव्हान हादरते; मागे सरते, आपला मार्ग मोकळा करते. या वर्षी हे अगदी असेच घडले! विलक्षण नकारात्मकतेला भेदून सूर्याची ताजी किरणे नव्याने येत्या वर्षाला देण्याचे आव्हान, प्रत्येक घराने, घरातील प्रत्येक माणसाने पेलले आहे. क्षेत्र कुठलेही असो, नवनिर्मितीच्या निर्झराने खडकातून वाट धुंडाळण्याचे साहस दाखवले आहे.
ज्या माध्यमांचा माझ्यामधल्या पिढीला सराव नव्हता; इतकेच काय काहीसा दूरस्थपणेच मी ‘नेट’ माध्यमापासून दूर राहात होतो. बोटांमधून लेखणी धरून कागदावर मन ओतण्याची पाच दशकांची अविरत सवय, या आव्हानाने बदलली नि मला हे नवे ‘नेट’ माध्यम अंगीकारता आले. या गेल्या वर्षात आता कसे लिहू? आता कुणाशी बोलू? हा पडलेला पेच निश्चयानेच सुटला, इतका की, या उरलेल्या प्रचंड वेळेचे काय करु? हे प्रश्नचिन्ह केव्हाच विरुन गेले व पूर्वी जे काम हातून घडलेच नसते ते होत गेले.
व्यासपीठावर टाळ्यांच्या कडकडाटात प्रवेश करण्याची व हंंशा आणि टाळ्या यांच्या गजरात प्रत्यक्ष जनसमुदायाला आपलेसे करण्याची सवय, आता वेब खिडक्यांतून दिसणाऱ्या व प्रतिसाद चटकन न कळण्याच्या माध्यमात बदलावी लागली आणि एकामागोमाग सुचू लागले. वेब उपक्रमाची मालिकाच मी सादर केली. केवळ एक दोन नव्हेत तर सुमारे पन्नास कार्यक्रम गेल्या वर्षभरात सादर केले.
विशेष म्हणजे कार्यक्रमांचे दिवस तर गजबजलेले व्यग्र गेलेच, पण कार्यक्रमांच्या तयारीचे अनेक दिवस माझ्यातील साधकाला, विद्यार्थी व रसिकाला समृध्द करणारे ठरले. उदारणार्थ ‘युवकांचे विवेकानंद’ हा विषय घेऊन बोलायचे ठरले, नि त्यानिमित्ताने अनेक वर्षांपूर्वी वाचलेले स्वामी विवेकानंदांचे चरित्र, त्यांच्या मुलाखती, पत्रे साऱ्यांच्या वाचनात इतका वेगळा आशयघन वेळ गेला की, हे सगळे ग्रंथ मी पुन्हा नेमके केव्हा वाचले असते हे मला सांगता येत नाही. विशेष म्हणजे, विषय मनोरंजक नसूनही ‘झूम’ मध्ये अपेक्षित अशा एकशेवीस युवकांनी आपली नावे नोंदवली होती. वाचकांना कौतुक वाटेल अशी एक गोष्ट म्हणजे-बोटीवर काम करणारा एक युवक जेव्हा रेंज मिळेल त्या वेळेत समुद्रातून जोडला जायचा. सिंगापूर, वॉशिग्टन अशा दुरून दुरून न पाहिलेले पुन्हा कधी भेटतील असे न वाटणारे, युवक माझ्या वेब कार्यक्रमात जोडले गेले. लंडनहून डाॅ. पारनाईक नावाचे ज्येष्ठ पती-पत्नी तेथील दिवसांचे वेगळे वेळापत्रक सांभाळून ‘झूम’वर यायचे, समुद्रापार असूनही बोलायचे. हा सगळा विलक्षण अनोखा अनुभव होता. प्रतिकूलतेच्या अनपेक्षित रेट्याने मी हे आव्हान स्वीकारले आणि माझे व्यावसायिक नसलेले, पण उद्दिष्टनिष्ठ कार्यक्रम याच काळात मी सादर करू शकलो. वाचकांना सांगताना आनंद होत आहे. या साऱ्या कार्यक्रमांचे शब्दांकन व संकलन-संपादन केल्यास आठ-दहा नव्या पुस्तकांचा ऐवज त्यातून मिळू शकतो.
मला चाळीसगावाच्या शुभम शेंडे नावाच्या युवकाचा एक मेसेज आला, तो खूप बोलका आहे. त्याने लिहिले, सर तुमच्यासाठी जणू कोविड, क्वारंटाइन अशा अडचणीच दिसत नाहीत. नव्या माध्यमाला तुम्ही ज्या सहजपणे स्वीकारलेत ते पाहिले, की वाटते, तुमच्या व्याख्यानमालेत एक पाऊलही फरक पडलेला नाही. अर्थात यात मदतीस होती घरातील पुढली पिढी. माझी कन्या वेदश्री तिचा उत्साह मला नवी ऊर्जा देणारा ठरला. आलेल्या फोनवर वेबकऱ्यांची नोदणी करणे, काही तिरकट बोलणाऱ्या अनोळखी फोनना सरळ पण परखड उत्तर देणे यात तिच्याही व्यक्तिमत्त्वाला वेगळा पैलू पडताना मी एक पिता म्हणून अनुभव घेत होतो.
सरत्या वर्षात पत्रांच्या ओठांनी घरी येणारी साद व दाद गोठली हे खरेच, पण आता ह्या ‘नेट’ माध्यमातून वाचक भेटू लागले, भरभरून बोलू लागले. हा अनुभव अनोखा होता. समाज माध्यमांना नावे ठेवण्यापेक्षा कसदार उपयोग करण्यात लेखक म्हणून माझा ‘कस’ होता. या वर्षभरात ‘संत-वसंत’ हे सूत्र घेऊन विशेष माहीत नसलेल्या संतांच्या कविता मी निवडून त्याच्या विश्वात्मक भक्तीचे दर्शन निरुपणातून प्रसारित केले. विशेष म्हणजे रोज सरासरी सातशे साडेसातशे वाचक स्वत: वाचून तो मजकूर त्यांच्या समूहावर टाकीत असत. हे माझ्या मनातले कार्य करण्यास मला अनेक वर्षे वेळच मिळत नव्हता, या आपत्ती काळात, अनेक संतांची विचार संपत्ती जी माझ्या घरात ग्रंथरूपात होती, ती मी जाणू शकलो आणि सर्वांना हा संतवसंतांचा बहर देऊन प्रत्यक्ष क्षण सृजनवंत जावा हा ध्यास घेतला नि तसे घडत गेले.
इतक्या वर्षांच्या मुशाफिरीत माझ्या आयुष्यात असंख्य अविस्मरणीय क्षण आले. असे क्षण केवळ स्वत:च्या मनात ठेवण्यासाठी नसतात, इतरांना वाटल्यावर त्यांचा सुगंध अधिकच वेगात व आवेगात दरवळतो. म्हणूनच हे कस्तुरगंध मी छायाचित्रांसह माझ्या फेसबुक पेजवर व्यक्त केले. त्यातल्या माझ्या माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, अमृता प्रीतम, पं. जितेंद्र अभिषेकी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या भेटीतले अत्तरक्षण सात्याने बहुसंख्येने वाचले गेले, हा मनातला आल्बमच मी खुला केला.
रसिकवाचक हे माझे विस्तारलेले प्रिय कुटुंब आहे. सरत्या वर्षातील दबावात्मक काळात मला त्यांना शक्य तेवढा आनंद देता आला, याचाच आज आनंद होत आहे. समाजमाध्यमांचा उपयोग निरर्थक गोष्टी प्रदर्शित करण्यात वा निष्पन्नशून्य वादावादीत करण्यापेक्षा तो जनसामान्यांना चैतन्याचा एक झरोका निर्माण करण्यासाठी करता येतो. हा न्यारा विश्वास मला या काळाने दिला.
विषाणूवर मात करण्यासाठी शरीरात घ्यावी लागणारी एक लस पुन्हा निरोगी करेलच; पण त्याआधी मनाचीच जीवनेच्छा व अदम्य जिगिषा जागी ठेवणे हे मला कलावंताचे कार्य वाटते. एक समाजमनाशी व विशेषत: भारताचे भविष्य असलेल्या युवक पिढीशी संवादी असलेला लेखक म्हणून, वक्ता म्हणून मी माझे कर्तव्य पूर्ण करू शकलो हा आनंद या वर्षाने मला दिला आणि येणाऱ्या वर्षासाठी निरोगी, निरामय व उत्साही भविष्य आपण देऊ शकतो. ही प्रेरणाही !
- प्रवीण दवणे
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)