Join us  

मतदार नोंदणीसाठी शाळा-महाविद्यालयांना साद; १८ ते ३० वयोगटांतील नवमतदारांचा टक्का कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 1:53 PM

कुणाला नोंदणी करता येईल? समजून घ्या सविस्तर

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नुकत्याच जाहीर केलेल्या तात्पुरत्या मतदार यादीत १८ ते ३० वर्षे वयोगटांतील तरुणांचा टक्का फारच कमी आहे. ही संख्या वाढविण्यासाठी पुन्हा एकदा शाळा-महाविद्यालयांना साद घालण्यात आली आहे. राज्याच्या एकूण लोकसंख्येत १८-१९ वयोगटांतील तरुणांची टक्केवारी चारच्या आसपास आहे. मात्र, यापैकी केवळ ०.३ टक्के तरुणांचीच नवमतदार म्हणून नोंदणी झाली आहे, तर २० ते २९ वर्षे वयोगटांतील तरुणांची टक्केवारी लोकसंख्येत २० टक्क्यांच्या आसपास आहे. त्यांचीही नोंदणी तुलनेत फार कमी म्हणजे १२ टक्के इतकी आहे. त्यामुळे नोंदणी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

नवमतदारांच्या मतदानासाठी...

  • यामुळे २०२४ला येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये नवमतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी २७ ऑक्टोबरपासून मतदार नोंदणी सुरू केली असून, त्यात शाळा-महाविद्यालयांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. 
  • शाळेतही ही मोहीम नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता राबविली जाणार आहे. शाळा १ ऑक्टोबर, २०२४ मध्ये जे विद्यार्थी वयाची १८ वर्षे पूर्ण करतील, त्यांच्याकडून नवमतदार म्हणून आगाऊ अर्ज भरून घेतले जाणार आहेत. राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्र यांच्याशी समन्वय साधून मतदार नोंदणीचा कार्यक्रम राबविला जाईल. 
  • तरुणांचा लोकशाही प्रक्रियेत सहभाग वाढायला हवा, त्यासाठी महाविद्यालयात तरुण मतदारांची नोंदणी करून घेण्यात काहीच वावगे नाही, असे मत व्यक्त करत, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे नेते सुधाकर तांबोळी यांनी या मोहिमेला पाठिंबा दर्शविला आहे.

कुणाला नोंदणी करता येईल?

  • १ जानेवारी, २०२४ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्याला मतदार म्हणून नोंदणी करता येईल. सध्या मतदार नोंदणी सुरू असून ती ९ डिसेंबरपर्यंत चालेल. 
  • यात मतदार यादीत नोंदणी, नावे वगळणे, सुधारणा ही देखील कामे होतील. त्यानंतर, ५ जानेवारी, २०२४ला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल, असे उप निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या जिल्हाधिकारी आपापल्या अखत्यारितील महाविद्यालये-शाळांमध्ये मतदार नोंदणी मोहीम राबवितात. त्यांच्याकडून वेळोवेळी आलेल्या सूचनांनुसार, आम्ही महाविद्यालयात नवमतदार नोंदणीकरिता मोहीम राबवितो. गेल्या वेळेस नोंदणीदरम्यान आम्ही २०० नवमतदारांची नोंदणी केली होती.-  डॉ. महेशचंद्र जोशी, प्राचार्य, चेतना महाविद्यालय.

 

 

टॅग्स :निवडणूकमतदानशाळामहाविद्यालय