शाडूच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 01:22 AM2017-07-31T01:22:24+5:302017-07-31T01:22:24+5:30
प्लॅस्टिक आॅफ पॅरिसचे विघटन होत नसल्याने, पर्यावरणपूरक अशा शाडूमातीपासून बनविलेल्या गणेशमूर्तींची गणेशमंडळांनी प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले.
मुंबई : प्लॅस्टिक आॅफ पॅरिसचे विघटन होत नसल्याने, पर्यावरणपूरक अशा शाडूमातीपासून बनविलेल्या गणेशमूर्तींची गणेशमंडळांनी प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले.
बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, मुंबई उपनगरे श्री गणेशोत्सव समन्वय समिती, अखिल भारतीय सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ व अन्य मंडळे, तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीस प्रशासन यांच्यासह विविध प्राधिकरणांचे अधिकारी यांची संयुक्त बैठक महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या वेळी महापालिकेतर्फे दरवर्षी प्रकाशित करण्यात येणाºया श्री गणेशोत्सव-२०१७ या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.
विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले की, महापालिकेच्या वतीने प्रतिवर्षी गणेशोत्सव आगमनानिमित्त करण्यात येणारी तयारी ही भव्य असते. देशभरासह जगातील लोक उत्साहाने यात सहभागी होतात. नागरिकांसाठी, तसेच त्यांच्या परिवारांसाठी हा उत्सव म्हणजे एक पर्वणीच असते. हा उत्सव अधिक आनंददायी होण्यासाठी गणेशाच्या आगमनापूर्वी रस्त्यांवरील खड्डे प्रशासनाने पूर्ण भरून घ्यावेत. गणेशाच्या सजावटीकरिता मखर (कागद)चा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर द्यावा.
दरम्यान, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबांवकर, विनोद घोसाळकर, सुरेश सरनोबत यांनी मार्गदर्शन करताना काही सूचना केल्या आणि सुप्रसिद्ध मूर्तिकार विजय खातू यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून बैठक संपविण्यात आली.