महाविकास आघाडीची आज वज्रमूठ सभा; शक्तिप्रदर्शन करण्याची जोरदार तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 06:51 AM2023-05-01T06:51:25+5:302023-05-01T06:52:03+5:30
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुंबईत आपली ताकद दाखवून देण्याची संधी उद्धव ठाकरे यांना आहे.
मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीनही पक्ष मजबुतीने एकत्र असल्याचा संदेश राज्यभरातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाविकास आघाडीकडून राज्यभर वज्रमूठ सभांचे आयोजन करण्यात आले असून, मुंबईतील सभा सोमवारी वांद्रे येथील बीकेसीच्या मैदानावर होणार आहे.
आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे या सभा झाल्या असून, मुंबईतील सभेत महाविकास आघाडीत सध्या असलेले अविश्वासाचे वातावरण दूर करण्याचे आव्हान तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांसमोर असणार आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीसाठी ही सभा महत्त्वाची आहे. त्यामुळे या सभेत शक्तिप्रदर्शन करण्याची जोरदार तयारी महाविकास आघाडीने केली आहे. महाविकास आघाडीत मुंबईत सर्वात जास्त ताकद शिवसेनेची असून, त्याखालोखाल काँग्रेसची आहे. त्यामुळे मुंबईतून गर्दी जमविण्याची जबाबदारी प्रामुख्याने या दोन पक्षांवर आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुंबईत आपली ताकद दाखवून देण्याची संधी उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळे ही सभा भव्य करण्यासाठी शिवसेनेकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. आतापर्यंतच्या वज्रमूठ सभांमध्ये उद्धव ठाकरे यांचे प्रमुख भाषण झालेले आहे, मुंबईतील सभेतही त्यांचेच भाषण प्रमुख असणार आहे. याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे दोन बडे नेते या सभेत भाषण करतील.