Join us

बंडखोरांविरोधात तोडफोड, समर्थकांचे शक्तिप्रदर्शन, सत्तेची लढाई आता रस्त्यावर; पाचव्या दिवशीही पेच कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 6:05 AM

शिवसेनेतील आघाडीचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने निर्माण झालेला राजकीय पेच पाचव्या दिवशीही कायम होता. दरम्यान, बंडखोर आमदारांविरुध्द राज्यात विविध ठिकाणी संतप्त शिवसैनिकांनी तोडफोड सुरु केली आहे.

शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे राज्यात अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नाराज झालेल्या शिवसैनिकांनी राज्यभरात ठिकठिकाणी शिंदे समर्थक आमदारांचा निषेध करीत त्यांच्या कार्यालयांची नासधूस सुरू केली आहे. शिंदे यांचे समर्थकही इरेला पेटले आहेत. त्यांनीही शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केली. सत्तेसाठीचा हा संघर्ष आता रस्त्यावर उतरल्याचे दिसत आहे.

शिवसेनेतील आघाडीचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने निर्माण झालेला राजकीय पेच पाचव्या दिवशीही कायम होता. दरम्यान, बंडखोर आमदारांविरुध्द राज्यात विविध ठिकाणी संतप्त शिवसैनिकांनी तोडफोड सुरु केली आहे. शिवसैनिकांचा रुद्रवतार पाहून बंडखोर आमदारांचे समर्थकही दोन हात करण्यास सरसावले असून त्यांनीही शक्तीप्रदर्शन केले. दरम्यान, यापार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांनी जमावबंदी आदेश जारी केला आहे.  मंत्री एकनाथ शिंदे यांचे भले मोठे पोस्टर नागपुरात लावण्यात आले होते. शिवसैनिकांनी ते फाडून टाकले. भोईसर (जि. पालघर) येथे शिंदे यांच्या पोस्टरला काळे फासण्यात आले. 

नाशिकमधील शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या प्रतिमेचे दहन करण्यासाठी शिवसैनिक एकवटले असताना आमदार कांदे यांच्या समर्थकांनी तो प्रयत्न हाणून पाडला. उल्हासनगर (जि. ठाणे) येथे एकनाथ शिंदे यांचे पुत्र शिवसेनेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. त्याला प्रत्युत्तर म्हणून खासदार शिंदे यांनी ठाण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. शिंदे यांच्या समर्थनार्थ ठाण्यात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक एकत्र आले होते.

साताऱ्या मंत्री शंभूराज देसाई यांच्या बंगल्यावर आंदोलन करण्यासाठी आलेल्या शिवसैनिकांना पोलिसांनी पांगवले. आमदार तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ शुगरचे पुण्यातील कार्यालय शिवसैनिकांनी फोडले. शिवाय उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यातील त्यांच्या संपर्क कार्यालयावरही शिवसैनिक चालून गेले. शिवसैनिक आणि बंडखोर नेत्यांचे समर्थक ठिकठिकाणी आमने-सामने येऊ लागल्याने पोलिसांपुढील डोकेदुखी वाढली आहे. 

महाराष्ट्रात ठिकठिकाणी बंडखाेरांना विराेध हाेत असताना खा. संजय राउत २१ बंडखाेर आमच्या साेबत असल्याचे सांगितले.   

 

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेनाउद्धव ठाकरे