मुंबई: देवनार डम्पिंग ग्राउंडमध्ये वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही व्यथित झाला आहे़ कचऱ्याचे डोंगर व त्याला लागणाऱ्या आगीवर तत्काळ तोडगा काढण्याची विनंती राज्यसभेचा विद्यमान खासदार असलेल्या सचिनने पालिका आयुक्त अजय मेहता यांना पत्राद्वारे केली आहे़सचिनने पत्रात म्हटले आहे, ‘डम्पिंग ग्राउंड परिसरात शिवाजीनगर येथील तीन वसाहतींमध्ये स्वत: पाहणी करून स्थानिकांशी चर्चा केल्यानंतर येथील भयाण परिस्थिती सुन्न करणारी होती़ येथील रहिवाशी मूलभूत सुविधांपासूनही वंचित असून, कचऱ्याला लागणाऱ्या आगीमुळे त्यांचे आरोग्य बिघडत आहे.’ स्वच्छता, पिण्यायोग्य पाणी, मलनि:स्सारण वाहिनी, प्राथमिक शिक्षण या मूलभूत सुविधा या परिसरात नाही़ अशा वेळी पालिकेने येथील आरोग्यासाठी राखीव निधीमध्ये केलेल्या कपातीबाबत तेंडुलकरने आश्चर्य व्यक्त केले आहे़ कचऱ्याचा भार या डम्पिंग ग्राउंडवरून कमी करण्यासाठी हाती घेतलेल्या छोट्या-छोट्या प्रकल्पांना गती देण्याची सूचनाही त्याने केली आहे़ (प्रतिनिधी)शिवाजीनगरच्या रहिवाशांची निदर्शनेशिवाजीनगर वसाहतींमध्ये सचिन तेंडुलकर फिरकलाच नाही़ त्यामुळे खोटे बोलून त्याने स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या आहेत़ या प्रकरणी त्याने जाहीर माफी मागावी़, अन्यथा त्याच्या विरोधात निदर्शन करणार, असा इशारा स्थानिक नगरसेवक मोहम्मद सिराज यांनी दिला आहे़
डम्पिंग आगीबाबत सचिनही व्यथित
By admin | Published: March 04, 2016 3:17 AM