Join us

१८ वर्षांनी एकत्र येणार सचिन आणि संतोष; 'यदा कदाचित रिटर्न्स'च्या शंभराव्या प्रयोगात केली घोषणा

By संजय घावरे | Published: December 04, 2023 8:42 PM

नवरा माझा नवसाचा'नंतर पुन्हा जमणार जोडी

मुंबई - पुढल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मी एका मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करणार आहे. या चित्रपटासाठी पुन्हा एकदा मी आणि संतोष पवार एकत्र काम करणार आहोत. चित्रीकरण सुरू झाल्यानंतर वेळेत पूर्ण करून पुढल्या वर्षीच तो रसिकांना पाहायला मिळेल असे म्हणत अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. 'यदा कदाचित रिटर्न्स' या नाटकाच्या शंभराव्या प्रयोगाच्या मंचावर सचिन बोलत होते. 

'यदा कदाचित रिटर्न्स' या नाटकाचा शंभरावा प्रयोग रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये रंगला. या प्रयोगाला ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल, ज्येष्ठ दिग्दर्शक-सिनेमॅटोग्राफर गोविंद निहलानी, निर्माते-दिग्दर्शक-अभिनेते सचिन पिळगावकर, त्यांच्या मातोश्री सुनीला शरद पिळगावकर, बहिण तृप्ती, दिग्दर्शक विजय केंकरे, अभिनेत्री मंगला केंकरे, अभिनेता संजय खापरे, अरुण कदम, पूर्णिमा अहिरे, निर्मात्या मानसी केळकर, किरण केळकर आदी मंडळी उपस्थित होती. यावेळी सचिन म्हणाले की, हा प्रयोग नसून सोहळा आहे.

प्रख्यात सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी या वयात नाटकाचा पूर्ण प्रयोग पाहिला याचं कौतुक वाटतं. आम्हा सर्व मराठी कलावंताकरीता खूप मोठी गोष्ट आहे. प्रेक्षकांनी हे नाटक इथपर्यंत पोहोचवलं असून, तेच या नाटकाला पुढेही नेणार आहेत. अडीच तास पूर्ण एनर्जीसह मनोरंजन करणं ही साधी गोष्ट नाही. १९९९पासून संतोषने 'यदा कदाचित'द्वारे हा प्रवास सुरू केला आणि विविध रूपांमध्ये तो समोर आणला. 'यदा कदाचित रिटर्न्स' या नाटकातील मर्म कायम ठेवून संतोषने शेवटही तसाच केला आहे. नाटकाच्या शेवटी डोळ्यांत पाणी आणले असेही पिळगावकर म्हणाले.

कोरोनापूर्वी रंगभूमीवर आलेले हे नाटक नंतर पुन्हा नाटक सुरू करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगत संतोष म्हणाला की, मित्र निर्माता दत्ता घोसाळकर सोडून गेल्याने त्या चक्रात अडकलो. कॉलेजचा मित्र किरण केळकर माझ्याकडे आला, तेव्हा मी स्लीप डिस्कने आजारी होतो. तालिमीलाही बेड असायचा. झोपून तालीम केली. आज हे नाटक शंभराव्या प्रयोगापर्यंत पोहोचल्याचा आनंद असल्याचे संतोष म्हणाला.

विजय केंकरे म्हणाले की, संतोषला मी प्रेमाने 'पॉवर' म्हणतो. मराठी रंगभूमीवर दिग्दर्शकाला बुकींग नसते, पण संतोष पवार हा एक असा दिग्दर्शक आहे, ज्याने स्वत:चा प्रेक्षकवर्ग तयार केला. त्याची एनर्जी अफलातून आहे. 'यदा कदाचित' आणि 'यदा कदाचित रिटर्न्स' हि दोन नाटके पाहिल्यानंतर लेखक संतोष पवारबद्दलही बोलले गेलं पाहिजे असंही केंकरे म्हणाले.

तसा धृतराष्ट्र पुन्हा पाहिला नाही...

१९९९मध्ये जेव्हा हे नाटक सर्वप्रथम रंगभूमीवर आले होते, तेव्हाही मी ते पाहिले होते. त्यात संजय खापरेने जो धृतराष्ट्र रंगवला होता तसा धृतराष्ट्र त्यापूर्वी आणि त्यानंतरही कधी पाहिला नाही. त्या भूमिकेसाठी मी संजयचा खूप मोठा फॅन असल्याचेही सचिन म्हणाले.