Join us  

सचिन डोंगरे ठरला ‘मुंबई श्री’

By admin | Published: March 01, 2016 2:56 AM

अत्यंत अटीतटीच्या झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत आर.के.एम. जिमच्या सचिन डोंगरेने प्रतिष्ठेच्या ‘मुंबई श्री’ किताबावर कब्जा केला.

मुंबई : अत्यंत अटीतटीच्या झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत आर.के.एम. जिमच्या सचिन डोंगरेने प्रतिष्ठेच्या ‘मुंबई श्री’ किताबावर कब्जा केला. विशेष म्हणजे याआधी दोनवेळा विजेतेपदाने हुलकावणी दिल्यानंतरही सचिनने जिद्द न सोडता अप्रतिम प्रदर्शन करीत बाजी मारली. त्याचवेळी पहिल्यांदाच आयोजित केलेल्या महिलांच्या स्पर्धेत ‘मिस मुंबई’ किताब पटकावताना श्वेता राठोडने सर्वांचे लक्ष वेधले; तर फिटनेस फिजिक्स प्रकारामध्ये जुनेद कालीवाला विजयी ठरला.कांदिवली येथील श्यामनारायण ठाकूर मैदानात झालेल्या या दिमाखदार स्पर्धेत सर्वच सहभागी स्पर्धकांनी आपल्या पीळदार शरीरयष्टीचे शानदार प्रदर्शन करताना प्रेक्षकांना खिळवून ठेवले. त्यात पहिल्यांदाच झालेल्या महिलांच्या मिस मुंबई स्पर्धेने आणखी उत्सुकता वाढवली. स्पर्धेच्या अंतिम विजेतेपदासाठी झालेल्या लढतीत अखेरच्या गटातील तिन्ही खेळाडू तोडीस तोड होते. त्यामुळे सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सचिन, अजय पेवेकर आणि रमेश जाधव यांच्यात किताबासाठी चुरशीची लढत झाली. पंचांनी अंतिम निकाल देताच अजय व रमेश यांची निराशा स्पष्टपणे दिसून आली; तर विजेत्या सचिनचा आनंद गगनात मावेनासा झाला. दोनवेळा विजेतेपद हुकल्यानंतरही त्याने प्रयत्न न सोडल्याचे फळ यंदा त्याला मिळाले. त्याचवेळी बॉडी वर्कशॉपच्या देवेंद्र वणगेकरने शानदार प्रदर्शन करताना बेस्ट पोझरचा किताब पटकावला. गुरुदत्त जिमच्या अजय पेवेकरला प्रगतिकारक खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. तर परब फिटनेस संघाने संपूर्ण स्पर्धेवर दबदबा राखताना सांघिक विजेतेपदावर नाव कोरले.दुसऱ्या बाजूला प्रथमच झालेल्या महिलांच्या स्पर्धेलाही शरीरसौष्ठवप्रेमींचा मोठा प्रतिसाद लाभला. अपेक्षेप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव असलेल्या श्वेताने बाजी मारली असली, तरी तिला जान्हवी पंडित व सारा सुरोशे यांच्याकडून कडवी झुंज मिळाली. मात्र मोक्याच्या वेळी अनुभवाच्या जोरावर श्वेताने बाजी मारली. यामुळे जान्हवी व सारा यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. (क्रीडा प्रतिनिधी)