मुंबई : तीन लिलाव प्रक्रियेत अपयश आल्यानंतर स्टेट बँक आॅफ इंडियाने विजय मल्ल्याचा गोव्यातील ‘किंगफिशर व्हिला’ हा बंगला अखेर विकला. अभिनेते व व्यावसायिक सचिन जोशी यांच्या मालकीच्या व्हायकिंग मीडिया आणि एंटरटेनमेंट या चित्रपट निर्माता कंपनीने ७३.0१ कोटी रुपयांत हा बंगला लिलावात विकत घेतला.विविध बँकांचे ९ हजार कोटींचे कर्ज वसूल करण्यासाठी स्टेट बँकेच्या वतीने बंगल्याचा तीन वेळा लिलाव करण्यात आला होता. मात्र तीनही वेळा बँकेला अपयश आले. गोव्यातील कंडोलिम येथे असलेल्या या बंगल्याची मूळ किंमत ८५ .२९ कोटी रुपये ठेवण्यात आली होती. त्यानंतर बंगल्याची मूळ किंमत ८१ कोटी करण्यात आली. या वेळीही बँकेच्या पदरी निराशा आली. अखेर ७३ कोटी रुपयांना या बंगल्याचा लिलाव झाला असून, एक लाख रुपये अटी व शर्तींसाठी जोशी यांनी बँकेकडे जमा केले आहेत. देशभरातील १७ बँकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज विजय मल्ल्यावर आहे. त्यामुळे कर्जवसुली करण्यासाठी बँकांचे प्रतिनिधित्व करत स्टेट बँकेने ही लिलाव प्रक्रिया पूर्ण केली. मल्ल्यावरील कर्जवसुलीसाठी मुंबई येथील किंगफिशर हाउसचाही लवकरच लिलाव होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, २०१५ साली सचिन यांनी किंग नामक मद्य कंपनी ९० कोटी रुपयांना विकत घेतली होती. (प्रतिनिधी)किंगफिशरचा नवा ‘किंग’सचिन जोशीने २०११ साली ‘अझान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. शिवाय मुंबई ‘मिरर’, ‘जॅकपॉट’ या चित्रपटांतूनही सचिन रुपेरी पडद्यावर झळकला. बॉलिवूडसह तेलगू चित्रपट निर्माता म्हणून सचिनची ओळख आहे. २०१२ साली सचिनने अभिनेत्री-मॉडेल उर्वशी शर्माशी विवाह केला.
सचिन जोशींनी घेतला विजय मल्ल्याचा बंगला विकत!
By admin | Published: April 09, 2017 4:05 AM