Join us

"प्रवीण तरडेंना महाराष्ट्रात फिरू देणार नाही"; जाणूनबुजून संविधानाचा अपमान केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 3:43 PM

अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडेंविरोधात आक्रमक भूमिका;

मुंबई: गणपतीची प्रतिष्ठापना करताना मूर्तीखाली संविधानाची प्रत ठेवल्यानं अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे सोशल मीडियावर ट्रोल झाले. अनेकांनी तरडेंवर टीकेची झोड उठवली. त्यानंतर तरडेंनी त्यांची फेसबुक पोस्ट डिलीट करत आपल्या हातून चूक झाल्याचं मान्य केलं. मात्र हा वाद शमलेला नाही. तरडे यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा थेट इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून (खरात) देण्यात आला आहे. प्रवीण तरडे हे जाणूनबुजून संविधानाचा अपमान करत आहेत. त्यांनी संविधानाच्या प्रतीवर गणपती बसऊन लोकशाहीचा अपमान केला आहे. महाराष्ट्र सरकारने त्वरित कारवाई करावी ही विनंती, असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यांनी या ट्विटमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि शंभुराज देसाई यांना मेन्शन केलं आहे. त्यामुळे या प्रकरणी काय कारवाई होणार याकडे लक्ष लागलं आहे. तरडेंना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारादेखील खरात यांनी व्हिडीओच्या माध्यमातून दिला आहे.नेमकं काय घडलं?प्रवीण तरडे यांनी घरच्या गणपतीची पुस्तकांचे मनोरे रचत प्रतिष्ठापना केली. त्यांची कल्पना चांगली होती. मात्र, गणपतीच्या मूर्तीच्या पाटाखाली संविधानाची प्रत ठेवल्यानं वादाला तोंड फुटलं. एका फेसबुक युजरने तरडेंना केसांची वाढ झाल्याने मेंदूची वाढ खुंटली असेल, अशी खोचक टीका केली आहे. तसंच गणपती बाप्पा प्रवीण तरडेंना सद्बुद्धी दे अशी प्रार्थना करत तरडेंना टोला लगावला. देशाच्या संविधानाचा अपमान केल्यावरून तरडे ट्रोल झाले. तरडेंनी मुद्दामहून असा खोडसाळपणा केल्याचे आरोप झाले.

काय म्हणाले प्रवीण तरडे?सोशल मीडियावर ट्रोल केल्यानंतर प्रविण तरडे यांनी एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये प्रवीण तरडे यांनी आपल्या हातातून झालेली चूक मान्य केलं. प्रवीण तरडे व्हिडिओ शेअर करत म्हणाले की, मी माझ्या घरी या वर्षी पुस्तक बाप्पा अशी संकल्पना केली होती. पण, यावेळी माझ्याकडून चूक झाली. गणरायाच्या मूर्तीच्या पाटाखाली संविधान ठेवलं होतं. कारण, गणराय हा बुद्धीचा आणि कलेचा दैवता आहे. त्यामुळे अशी माझी भावना होती. पण, ती खूप मोठी चूक होती. ही चूक मला अनेकांनी फोन करुन निदर्शनास आणून दिली, असं प्रवीण तरडे यांनी सांगितलं. यानंतर मी माझी चूक सुधारली असून पुन्हा अशी चूक होणार नाही, अशी ग्वाही तरडे यांनी दिली.गणपतीच्या पाटाखाली राज्यघटना ठेवल्यानं अभिनेता प्रवीण तरडेवर टीकेची झोड, FB पोस्ट केली डिलीटVideo: गणरायाच्या डेकोरेशनमुळे सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर प्रवीण तरडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

टॅग्स :प्रवीण तरडेगणेशोत्सव