मुंबई : प्रसिद्ध अभिनेते तसेच दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांचे वडील शरद पिळगावकर यांची सन्मानचिन्हे चोरीला जाण्याचा प्रकार सांताक्रुझमध्ये उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी त्यांच्या नोकराला अटक केली. त्याने ही सन्मानचिन्हे भंगारात विकल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.
अमृत सोळंकी (३७) असे अटक नोकराचे नाव आहे. सचिन हे अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात राहत असून सांताक्रुझच्या जुहू तारा रोडवर जुहू अपार्टमेंटमध्ये त्यांचे कार्यालय आहे. त्यांचे वडील दिवंगत शरद पिळगावकर यांना निर्माते म्हणून मिळालेली चित्रपटांची सन्मानचिन्हे सचिन यांनी आठवण म्हणून जतन केली होती. कार्यालयाची डागडुजी सुरू असल्याने सचिन यांच्या पत्नी सुप्रिया या गुरुवारी सकाळी काम पाहण्यासाठी तेथे गेल्या. त्यावेळी कार्यालयातील सन्मानचिन्हे गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेथे बरीच वर्षे काम करणाऱ्या सोळंकीला त्यांनी विचारले असता धूळ बसेल म्हणून सन्मानचिन्हे गोणीत भरून ठेवली होती, मात्र कामगारांनी ती दगडमातीची गोणी समजून फेकली असावीत असे त्याने सांगितले. सुप्रिया यांनी ही बाब सचिनना सांगितली. त्यानुसार सचिन यांनी तक्रार दाखल केल्यावर चोरी उघडकीस आली.