Sachin Tendulkar vs NCP: भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला राज्य सरकारने स्माईल अँबेसेडॉर (Smile Ambassador) म्हणून नियुक्ती केली. मंगळवारी राज्यभरात मौखिक स्वच्छतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने असलेल्या महाराष्ट्राच्या स्वच्छ मुख अभियान (SMA) साठी त्याची 'स्माइल अॅम्बेसेडर' म्हणून नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरकारचे अभिनंदन केले, पण सचिनला मात्र सुनावले.
कुस्तीपटूंच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीने सचिनवर सोडलं टीकास्त्र
"प्रिय सचिन तेंडुलकर, हे जाणून आनंद झाला की महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप सरकारने राज्याच्या 'स्वच्छ मुख अभियाना'साठी "स्माइल अॅम्बेसेडर" म्हणून तुमची नियुक्ती केली आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का की भाजपने त्यांचे खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांना पाठिंबा देण्यासाठी आपल्या भारतीय कुस्तीपटूंच्या चेहऱ्यावरचे हास्य हिरावून घेतले आहे? कुस्तीपटू न्याय मागत आहेत, पण भाजप आपल्या खासदाराला वाचवण्यासाठी कुस्तीपटूंच्या न्याय्य मागण्यांकडे डोळेझाक करत आहे. तुमच्याप्रमाणेच आपल्या देशातील महिला कुस्तीपटूही देशाची शान व अभिमान आहेत. एक खेळाडू म्हणून, आपल्या क्रीडा क्षेत्रातील सहकाऱ्यांना पाठिंबा देणे तुमचे कर्तव्य आहे. आशा आहे की तुम्ही त्यांच्या प्रश्नावरही व्यक्त व्हाल आणि कुस्तीपटूंचे देखील "स्माइल अॅम्बेसेडर" व्हाल," असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाइड क्रास्टो यांनी ट्विटद्वारे लगावला आणि कर्तव्याची आठवण करून दिली.
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरूद्ध कुस्तीपटूंनी आंदोलन पुकारले आहे. त्यात आंदोलनाचे विविध पैलू गेल्या महिनाभर पाहायला मिळाले आहेत. दिल्ली रविवारी कुस्तीपटूंचे आंदोलन पोलिसांच्या सहाय्याने दडपण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यानंतर आता आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज संध्याकाळी हे सर्व खेळाडू ६ वाजता हरिद्वारला जाणार असून तिथे पदकं विसर्जित करणार आहेत. कुस्तीपटू बजरंग पुनियाने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. कुस्तीपटूंनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटले आहे की, पदके हेच आमचे जीवन असून ती गंगेत वाहून गेल्यावर आमच्या जगण्याला अर्थ उरणार नाही, त्यामुळे आम्ही इंडिया गेटवर आमरण उपोषणाला बसू, असा इशारा कुस्तीपटूंनी दिला आहे. त्यामुळे प्रकरण इतक्या टोकाला जात असताना, सचिनने क्रीडा क्षेत्राशी असलेली बांधिलकी लक्षात घेत कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ उभे राहावे, अशी अपेक्षा आणि राष्ट्रवादीकडून व्यक्त करण्यात आली आहे.