मुंबई : ‘शिवाजी पार्क मैदानाबाहेर असलेल्या एका हॉटेलमध्ये मी माझी पहिली मुलाखत दिली होती. त्यावेळी मला मुलाखत म्हणजे काय हेही माहीत नव्हते. बरं, बोलून झाल्यानंतर पुढे काय होणार तेही माहीत नव्हते. चहा आणि मस्कापाव खात मी मुलाखत दिली होती. त्यावेळी मोठा भाऊ अजितसोबत असल्याने फारसे दडपण आले नव्हते,’ अशी आठवण सांगत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने जुन्या आठवणींना उजाळा दिला.
येत्या सोमवरी सचिन आपला ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने मुंबईत झालेल्या एका समारंभात सचिनने आपल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ‘हे अर्धशतक माझ्या आयुष्यातील सर्वांत संथ अर्धशतक आहे,’ असेही सचिनने मिश्कीलपणे म्हटले. यावेळी सचिनने अनेक आठवणी सांगितल्या. शालेय जीवनात शतक झळकावल्यानंतर वर्तमानपत्रात फोटो न आल्याने सचिन निराश झाला होता. त्याबाबत सचिन म्हणाला की, ‘शालेय क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकावल्यानंतर त्या सामन्याचे वृत्त वर्तमानपत्रात आले होते; पण माझा फोटो छापला गेला नव्हता. त्यामुळे मला अनेकांनी चिडवलेही. त्यामुळे मी नाराज झालेलो; पण पुढे नेहमीच फोटोसहित बातम्या छापून येऊ लागल्या.’
सचिनने पुढे सांगितले की, ‘चांगल्या कामाचे कौतुक केल्याने खेळाडूंना प्रोत्साहन मिळते. माझ्याबाबतीत मीडियाने हे खूप चांगल्याप्रकारे केले. त्यासाठी मी आभार मानतो’.
बर्थ-डे सेलिब्रेशन ‘टॉप सिक्रेट’वाढदिवसाच्या सेलिब्रेशनबाबत सचिन म्हणाला की, ‘खरे म्हणजे, मलाही माहीत नाही की कुठे आणि कसे सेलिब्रेशन होणार आहे. कुटुंबीयांनी तयारी सुरू केली आहे; पण मला या प्लॅनपासून दूर ठेवले आहे. त्यामुळे आता मला सोमवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.’