Join us

‘क्रिकेटचा देव’ गेला ‘राज’दरबारी! सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरेंची ‘शिवतीर्थ’वर भेट; पाहा, Video

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 3:14 PM

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने शिवतीर्थ या नव्या घरी जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली.

मुंबई: राज्याच्या राजकारणात वर्षा (Varsha), मातोश्री (Matoshri) आणि सिल्वर ओक (Silver Oak) या घरांना जितके महत्त्व आहेत, तितकेच महत्त्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या निवासस्थानाला आहे. अलीकडेच दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर आपल्या नव्या घरात गृहप्रवेश केला. राज ठाकरे हे कृष्णकुंजवर राहत होते. मात्र, अलीकडेच ते शिवतीर्थ (Shivtirtha) या आपल्या नव्या घरात राहायला गेले आहेत. यातच क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)  याने राज ठाकरे यांची शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली. या भेटीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 

दिवाळीला पाडव्याचा शुभ मुहूर्त साधून राज ठाकरे यांनी आपल्या नवीन घरात प्रवेश केला. कृष्णकुंजच्या शेजारीच राज ठाकरेंचे नवे निवासस्थान बांधण्यात आले आहे. राज ठाकरेंचे नवे निवासस्थान सर्व सोईसुविधांनी युक्त आहे. तसेच येथेच मनसेचे मुख्य कार्यालय असेल. त्याबरोबरच एक ग्रंथालयही येथे असेल. इमारतीच्या वरच्या मजल्यांवर ठाकरे कुटुंबीयांची राहण्याची व्यवस्था असेल. राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांचा स्नेह जगजाहीर आहे. राज ठाकरे यांच्या नवीन घरी सचिन तेंडुलकर पोहोचला. सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरे यांच्या भेटीचा नेमका उद्देश काय, याबद्दल माहिती मिळालेली नसली, तरी सचिनने राज यांच्या नव्या घराला सदिच्छा भेट दिल्याचे सांगितले जात आहे.

सचिनचा एक फोटो व्हायरल

सचिन तेंडुलकरने राज ठाकरे यांची शिवतीर्थवर जाऊन भेट घेतल्यावर सचिनचा एक फोटो व्हायरल झाला आहे. एका पेंटिंगच्या शेजारी उभे राहून त्याने हा फोटो काढला आहे. हा फोटो राज ठाकरे यांच्या घरातील असल्याचं सांगितले जात आहे. तसेच नव्या घराच्या गॅलरीत राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकर हे दोघेही उभे असताना अनेकांनी त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

दरम्यान, नवे घर राज ठाकरे यांनी खूप उत्साहाने सजवले आहे. राज ठाकरे यांचा हा नवा बंगला पाच मजल्यांचा आहे. या बंगल्याचे इंटेरियर राज ठाकरे यांनी स्वतः डिझाइन केले आहे. घरातील बहुतांश गोष्टी या राज ठाकरे यांनी जातीने लक्ष घालून पसंत करून घेतल्या आहेत, असे सांगितले जात आहे.  

टॅग्स :मुंबईराज ठाकरेसचिन तेंडुलकर