"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 10:17 AM2024-05-21T10:17:18+5:302024-05-21T10:26:41+5:30

प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरविरोधात आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Sachin Tendulkar should return the Bharat Ratna otherwise we will protest warned Bachu Kadu | "सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा

"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा

Bachu Kadu : ऑनलाईन रमीच्या जाहिरातीवरुन गेल्या काही महिन्यांपासून भारतरत्न सचिन तेंडूलकर आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्यात मोठा वाद सुरु आहे. मात्र आता पुन्हा एकदा बच्चू कडू सचिन तेंडुलकर विरोधात आक्रमक झाले आहेत. काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाने राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यावरुनच आता बच्चू कडू यांनी सचिनला घेरलं आहे. सचिन तेंडुलकरने भारतरत्न परत करावा नाहीतर मुंबईतील त्याच्या घराबाहेर मोठे आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. सचिन तेंडुलकरचा सुरक्षारक्षक प्रकाश कापडे याने ऑनलाईन रमीच्या व्यसानमुळे आत्महत्या केल्याचा दावा कडू यांनी केला आहे. 

सचिन तेंडुलकर विरोधात बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. ऑनलाईन रमीच्या जाहिरातीवरुन बच्चू कडू यांनी सचिनविरोधात गंभीर आरोप केला. सचिन तेंडुलकरचा सुरक्षारक्षक प्रकाश कापडे याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील मूळ गावी प्रकाश कापडे यांनी आत्महत्या केली होती. सुरुवातीला कापडे यांनी आत्महत्या का केली याचे कारण समोर आलं नव्हतं. मात्र आता बच्चू कडू यांनी केलेल्या आरोपांमुळे अधिक माहिती समोर आली. ऑनलाईन रमीमुळे आलेल्या कर्जबाजारीपणामुळे कापडे यांनी आत्महत्या केल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.

सचिनचा पुतळा जाळून आंदोलन करणार

कापडे यांच्या आत्महत्येवरुन बच्चू कडू यांनी संताप व्यक्त करत सचिन तेंडुलकरचा निषेध व्यक्त केला आहे. सचिन तेंडुलकर करत असलेल्या जाहिरातीमुळे कापडे यांचा जीव गेला असा आरोप करत त्याने भारतरत्न परत करावा अशी मागणी बच्चू कडू यांनी केली. पुरस्कार परत नाही केला तर नाही तर ६ जून शिवराज्यभिषेक दिनाच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर त्याचा पुतळा जाळून आंदोलन करणार”, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

सचिनच्या जाहिरातीमुळे जीव गमावला - बच्चू कडू

"जो अंगरक्षक सचिन तेंडुलकरचे जीव वाचविण्याचे काम करत होता, त्याच अंगरक्षकाला सचिन करत असलेल्या जाहिरातीमुळे जीव गमवावा लागला आहे. अंगरक्षकाला आत्महत्या करायची वेळ अली असेल तर सचिन तेंडुलकरने ही जबाबदारी उचलली पाहीजे. ज्याला भारतरत्न म्हणून आपण गौरविले, त्याच्या जाहिरातीमुळे अशी आत्महत्या करावी लागत असेल तर हे दुर्दैव आहे," असे बच्चू कडू यांनी म्हटलं.

दरम्यान, सचिन तेंडुलकरच्या सुरक्षा व्यवस्थेतील राज्य राखीव पोलीस दलातील अंगरक्षक प्रकाश कापडे यांनी १५ मे रोजी पहाटे जामनेर येथील निवासस्थानी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. याआधी प्रकाश कापडे यांनी मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडेही सुरक्षाव्यवस्थेतील अंगरक्षक म्हणून काम केले होते. सध्या ते सचिन तेंडुलकरच्या मुंबई येथील निवासस्थानी सुरक्षाव्यवस्थेत अंगरक्षक म्हणून तैनात होते. आठवडाभरापूर्वी ते जामनेर येथील आपल्या निवासस्थानी परतले होते. तिथेच त्यांनी आत्महत्या करत स्वतःला संपवले.
 

Web Title: Sachin Tendulkar should return the Bharat Ratna otherwise we will protest warned Bachu Kadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.