Join us

मास्टर ब्लास्टरने सुचवला मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय, जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2017 12:47 PM

मुंबईतील वाहतूक कोंडीवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने उपाय सुचवला आहे.

ठळक मुद्देमुंबईतील वाहतूक कोंडीवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने उपाय सुचवला आहे.हाँगकाँगसारखी जलवाहतूक सेवा मुंबईतही सुरू करण्यात यावी, असं सचिनने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

मुंबई- मुंबईमध्ये असलेली वाहतूक कोंडीची समस्या काही नविन नाही. मुंबईतून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला या वाहतूक कोंडीचा सामना करत प्रवास करावा लागतो. मुंबईतील या वाहतूक कोंडीवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने उपाय सुचवला आहे. हाँगकाँगसारखी जलवाहतूक सेवा मुंबईतही सुरू करण्यात यावी, असं सचिनने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. याशिवाय इतर सुविधा पुरवण्याबाबतही त्याने अनेक उपाय या पत्रातून सुचविले आहेत. मुंबईचे जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाहा यांना पत्र देऊन त्याच्याकडील उपाय सुचविले आहेत. 

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर खासदार निधीतून पादचारी पुलांसाठी तात्काळ निधी देण्याची घोषणा करणाऱ्या मुंबईकर सचिनने शहरातील सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत चिंता व्यक्त केली आहे. 'व्हिजन २०२५' ही प्रकल्प योजना डोळ्यांसमोर ठेवून त्याने शहरात नो पार्किंग झोनची संख्या वाढवावी, स्वतंत्र हॉकिंग झोन, पाचदारी पूल आणि रेल्वे स्थानकांवरील फलाट रुंद करण्यात यावेत, अशा सूचना त्याने मुंबईचे जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाहा यांना पत्राद्वारे पाठवल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'व्हिजन २०२५' ची घोषणा केली आहे. त्यासाठी त्यांनी शहरातील नागरिकांकडून सूचना मागवल्या होत्या. त्यानुसार सचिनने जिल्हाधिकाऱ्यांना सूचनांचं पत्र पाठवलं आहे. हाँगकाँगप्रमाणेच मुंबईतही जलवाहतुकीला चालना द्यावी. तसंच ही सेवा शहरातील इतर भागांना जोडली तर रस्ते आणि रेल्वेसेवेवरील ताण कमी होऊ शकतो, असं सचिनचं म्हणणं आहे. मुंबईमध्ये फूटपाथवरील फेरीवाल्यांची समस्या गंभीर आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या स्टॉलसाठी स्वतंत्र जागा देण्यात यावी, रेल्वे स्टेशनपासून काही ठराविक अंतरावर असे झोन तयार केले जावेत. तसंच फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र आठवडा बाजार, रेल्वे प्रवाशांसाठी स्वतंत्र स्कायवॉक मार्ग बांधण्यात यावेत, ज्याचा फायदा रेल्वे प्रवाशांना होईल, असं सचिनने म्हंटलं आहे. शहरात ग्रीन झोन तयार करावेत, अशी मागणीही त्याने केली आहे. तसंच हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी लोकांनी सायकल चालवण्यावर भर द्यावा, असं आवाहन सचिनने मुंबईकरांना केलं आहे. तसंच रस्त्यावर कचरा टाकण्याची समस्या दूर करावी, पार्किंग व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी सचिनने केली आहे.

टॅग्स :सचिन तेंडूलकरमुंबई