Join us

Sachin Vaze Arrested: सचिन वाझेंची 13 तास चौकशी, नंतर अटक; रात्री नेमकं काय झालं?, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 8:39 AM

सचिन वाझे यांना शनिवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. (Antilia case: NIA arrests mumbai police officer API sachin vaze)

मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणी तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना एनआयएने अटक केली आहे. एनआयएने सांगितल्यानुसार, सचिन वाझे यांना आईपीसीच्या कलम 286, 465, 473, 506(2), 120 बी आणि 4 (ए)(बी)(आय) स्फोटक वस्तू कलम 1908 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. तसेच सचिन वाझेंच्या अटकेनंतर ठाण्यातून आणखी तिघांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

सचिन वाझे यांना शनिवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. अटकेपूर्वी तब्बल 13 तास सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. सचिन वाझे काल सकाळी 11 वाजताच एनआयएच्या कार्यालयात हजर झाले होते, तेव्हापासून त्यांची चौकशी सुरु होती. जवळपास 13 तासांच्या चौकशीअंती एनआयएने त्यांना अटक केली. आज (14 मार्च) सकाळी 11 च्या सुमारास त्यांना कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. गेल्या 15 दिवसांत अंबानी स्फोटके प्रकरणातही सगळ्यात मोठी घडामोड म्हणून पाहिली जातेय, त्यामुळेच सचिन वाझेंच्या अटकेनं खळबळ उडाली आहे. (Antilia case: NIA arrests mumbai police officer API sachin vaze)

विशेष म्हणजे सचिन वाझेंनी याआधीच न्यायालयात धाव घेत अंतरिम जामीनासाठी प्रयत्न केले होते. मात्र, न्यायालयाने प्रथमदर्शी अर्जदाराविरोधात पुरावे दिसत असल्याचं निरिक्षण नोंदवलं. तसेच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची गरज असल्याचं म्हणत हा जामीनाचा अर्ज फेटाळला. यावेळी न्यायालयाने तपास संस्थांचं मत महत्त्वाचं असल्याचं म्हटलं होतं.

सचिन वाझेंचं व्हॉट्सअॅप स्टेटस

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांची बदली झाल्यानंतर त्यांचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस लक्ष वेधून घेत आहे. जगाला आता गुडबाय करायची वेळ जवळ आली आहे, असं सूचक स्टेटस वाझेंनी ठेवल्यामुळे खळबळ उडाली होती.  

अर्णब यांच्या अटकेसाठी ‘त्या’ स्कार्पिओचा वापर -

साहाय्यक निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडील चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. हिरेन यांच्या महिंद्रा स्कॉर्पिओचा वापर सुमारे चार महिन्यांपूर्वी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवेळी (4 नोव्हेंबर) करण्यात आला होता. 25 फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या असलेली कार सापडली होती. ती तेव्हा वाझे यांच्याकडे होती. याच गाडीतून अर्णब गोस्वामी यांच्या घरी ते गेले होते. मात्र त्या वेळी या स्कॉर्पिओला अन्य नंबर प्लेट लावली होती, असे सूत्रांकडून सांगण्यात येते.

सचिन वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात बदली-

दरम्यान या प्रकरणात चर्चेत असेलेले पोलीस आधिकारी सचिन वाझे  यांची क्राईम ब्रान्चमधून बदली करण्यात आली. वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात बदली करण्यात आली.  पोलीस मुख्यालयातून सचिन वाझे यांच्या बदलीसंदर्भात आदेश काढण्यात आले.  

नेमकं काय आहे प्रकरण- 

अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर स्फोटके आणि धमकीचे पत्र असलेली स्कॉर्पिओ कार सापडल्यानंतर, या प्रकरणाचा तपास वाझे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र, या स्कॉर्पिओ कारचे मालक व्यापारी मनसुख यांचा मृत्यू झाला आणि वाझे संशयाच्या भोवऱ्यात सापडले. या प्रकरणी विरोधी पक्षाने त्यांचे निलंबन करून तत्काळ अटकेची मागणी केली होती. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा तपास राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविला होता.  दहशतवाद विरोधी पथकानेही मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणांत वाझे यांची तब्बल दहा तास चौकशी केली.

टॅग्स :सचिन वाझेमनसुख हिरणपोलिसराष्ट्रीय तपास यंत्रणाअटकमुंबई