सचिन वाझे उत्तम तपास अधिकारी; विरोधकांनी राजीनामा अन् बदल्यांमध्ये रमू नये- संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 02:59 PM2021-03-10T14:59:34+5:302021-03-10T14:59:59+5:30
स्कॉर्पिओ गाडीचं प्रकरण फार मोठं नाही, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
मुंबई: मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात (Mansukh Hiren Case) अडचणीत आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांची गुन्हे शाखेतून उचलबांगडी करण्यात आली आहे. सचिन वाझेंवर हिरेन यांच्या पत्नीनं खुनाचा आरोप केला आहे. तरीही ते या पदावर ठेवलं जात असल्यास पुरावे नष्ट केले जाऊ शकतात. सचिन वाझेंना पाठिशी घालण्याचं कारण काय, असा सवाल भारतीय जनता पक्षाकडून उपस्थित करण्यात येत होता. अखेर या प्रकरणी ठाकरे सरकारला बॅकफूटवर जावं लागलं. सचिन वाझे यांची गुन्हे शाखेतून बदली करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आज विधान परिषदेत केली.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. सचिन वाझे असो वा कुणीही, शासन कुणालाही पाठीशी घालणार नाही. विरोधकांनी त्यांच्याकडील पुरावे एटीएसला द्यावेत, तसंच सचिन वाझे यांची बदली करण्यात येत असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी विधानपरिषदेत सांगितलं आहे. मात्र केवळ बदली नको, तर त्यांचं निलंबन करा, त्यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी विधानसभेसह विधानपरिषदेत केली. याचपार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
संजय राऊत एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हणाले की, सचिन वाझे उत्तम तपास अधिकारी आहे. स्कॉर्पिओ गाडीचं प्रकरण फार मोठं नाही. अंबानींच्या जीवाएवढीच सामान्य आणि आंदोलक शेतकऱ्यांच्या जीवाची किंमत आहे. विरोध पक्षाने फक्त राजीनामा आणि बदल्यांमध्ये रमू नये, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.
शरद पवार यांनी अजित पवार आणि अनिल देशमुख यांना महत्त्वाचा सल्ला दिल्याचे समजते. https://t.co/dQFYotSnWN#MansukhHiren@BJP4India@NCPspeaks
— Lokmat (@MiLOKMAT) March 10, 2021
मी अजिबात समाधानी नाही- प्रवीण दरेकर
मी अजिबात समाधानी नाही. ठाकरे सरकार सचिन वझेंना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. सचिन वझेंची बदली नाही, तर निलंबित केलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. सचिन वाझेंनीच मनसुख हिरेन यांचा खून केल्याचा आरोप हिरेन यांच्या पत्नीनं केला आहे, असं विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.