मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणी तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना एनआयएने अटक केली आहे. एनआयएने सांगितल्यानुसार, सचिन वाझे यांना आईपीसीच्या कलम 286, 465, 473, 506(2), 120 बी आणि 4 (ए)(बी)(आय) स्फोटक वस्तू कलम 1908 अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयितरित्या मृत्यू झाल्यानंतर सचिन वाझे वर आरोप ठेवण्यात आलेत आणि शनिवारी रात्री उशीरा त्यांना एनआयएने अटक केली आहे.
पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव पहिल्यांदाच चर्चेत आलेलं नाही. याआधीही काही प्रकरणांमध्ये वाझे यांचं नाव समोर आलं होतं. सचिन वाझे हे मूळचे कोल्हापूरचे आहेत. कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील उभ्या मारुती मंदिराजवळ त्यांचे वडिलोपार्जित घर आहे. त्याचे दुसरे भाऊ कार इंडस्ट्री मध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत. एक सनकी स्वभावाचा पोलीस म्हणून सचिन वाझे यांची कोल्हापुरात ओळख आहे.
सचिन वाझेंनंतर ठाण्यातील एका नेत्याची चौकशी होणार?; मोठी घडामोड, राजकारणातही खळबळ
एबीपी माझाच्या वृत्तानूसार, लहानपणापासूनच पोलीस दलात रुजू होण्याची सचिन वाझे यांची इच्छा होती. पोलीस दलात रुजू झाल्यापासून त्यांनी कोल्हापूरमधील कुटुंबीयांसोबत आपलं नातं तोडून टाकलं. त्यांच्या आईचं काही वर्षापूर्वी निधन झाल्यानंतर सचिन वाझेंना ही दुःखद वार्ता कळवण्यात आली त्यावेळी त्यांनी कोल्हापुरात येण्यास नकार दिला होता. 'मला वेळ नाही' असा निरोप देऊन त्यांनी आईचे अंत्यसंस्कार लहान भावाला करण्यास सांगितले होते.
सचिन वाझेवर मधल्या काळात काही आरोप लागल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर त्या वेळी त्यांनी चीन इथल्या काही कंपन्यांसोबत करार करून चायनीज वस्तू इम्पोर्ट-एक्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. त्यांचा हा व्यवसाय अद्यापही सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.
सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोनदा बदली
सचिन वाझे (Sachin Vaze) यांची आधी नागरी सुविधा केंद्रात (सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर ) विभागात बदली करण्यात आली होती. यासंदर्भात पोलीस मुख्यालयातून गुरुवारी रात्री अधिकृत पत्रक निघाले होते. मात्र, त्यानंतर लगेच त्यांची एसबी-1 म्हणजेच विशेष शाखेत त्यांची कागदोपत्री बदली करण्यात आली आहे. दरम्यान, सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोनदा बदली झाली होती.
कोण आहेत सचिन वाझे?
- सचिन वाझे 1990 मध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून मुंबई पोलिसात ज्वाईन झाले होते. त्यांनी आतापर्यंत 63 एन्काऊंटर केले आहेत.
- नुकतंच Republic TV चे संपादक अर्णब गोस्वामी यांना त्यांनी घरातून अटक केली होती. गोस्वामींच्या अटकेसाठी तयार केलेल्या टीमचं नेतृत्व सचिन वाझे यांनी केलं होतं.
- सचिन वाझे जवळपास 13 वर्षांनंतर 6 जून, 2020 रोजी पुन्हा पोलिस फोर्समध्ये परतले आहेत. त्यांनी 2007 मध्ये मुंबई पोलिसातून राजीनामा दिला होता.
- सचिन वाझे यांनी छोटा राजन आणि दाऊद इब्राहिमच्या अनेक गुंडांचा एन्काऊंटर केला आहे. एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा त्यांचे बॉस होते.
- सचिन वाझेंसह 14 पोलिस कर्मचाऱ्यांना 2004 मध्ये सस्पेंड करण्यात आलं होतं. या सर्वांवर 2002 घाटकोपर ब्लास्टचा आरोपी ख्वाजा यूनिसच्या कस्टोडियल डेथचा आरोप होता.
- सस्पेंशन काळ संपल्यानंतर नाराज होत त्यांनी 2007 मध्ये पोलिस फोर्सचा राजीनामा दिला.
- 30 नोव्हेंबर 2007 रोजी त्यांनी मुंबई पोलिसांची नोकरी सोडल्यानंतर 2008 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता.
- 2020 मध्ये कोरोना महामारीच्या काळात सचिन वाझे पुन्हा पोलिस फोर्समध्ये परतले.