मुंबई: कारमायल रोडवरील कारमध्ये ठेवण्यात आलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हत्या प्रकरणातील आरोपी, बडतर्फ एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) याची सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून चौकशी सुरू आहे. तळोजा कारागृहात असलेला वाझे आणि अटकेत असलेला संजीव पालांडे व कुंदन शिंदे याची सोमवारी समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. वाझेकडे गेल्या ३ दिवसांत एकूण १५ तास चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याबाबतचा अहवाल न्यायालयासमोर ठेवून पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तळोजा कारागृहात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या चौकशीचे सत्र तूर्त थांबविल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मुंबईतील बारमालकांकडून वसूल केलेले ४.७० कोटी डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे व स्विय सहायक कुंदन शिंदे यांच्याकडे दिल्याची कबुली वाझेने दिली होती. मात्र, दोघेजण इन्कार करीत होते, त्याबाबत न्यायालयाच्या परवानगीने शनिवारपासून वाझेचा जबाब नोंदविला जात आहे.
माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटी वसुलीचा केलेल्या आरोपाबाबत, काही बार मालकांनी सचिन वाझेला दिलेल्या पैशांबाबत प्रश्न विचारण्यात आले. या सगळ्या मुद्यांवर सचिन वाझेने सविस्तर उत्तरं दिली आहेत. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला बार मालकाकडून महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट दिलं होतं असा आरोप केला होता. या आरोपानुसार ईडीने तपास केला. तसेच अनेक बार मालकांचे जबाबही नोंदविले.
आम्ही वसुलीचे पैसे सचिन वाझे यांना दिल्याचं बार मालकांनी जबाबात म्हटलं आहे. बार मालकांकडून पैसे घेताना हे पैसे नंबर वन यांना द्यायचे आहेत, असं सचिन वाझे सांगायचा. नंबर वन म्हणजे नक्की कोण याचा खुलासा ईडीच्या अधिकाऱ्यांना होत नव्हता. त्याचाही खुलासा सचिन वाझे याच्या जबाबात झाला आहे. नंबर वन म्हणजे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेच असल्याचं सचिन वाझेने आपल्या जबाबात सांगितल्यांची माहिती ईडी सूत्रांनी दिली आहे.