मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर जेलिटीनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळल्यापासून सुरु झालेल्या सचिन वाझे प्रकरणाला रोज नवे वळण मिळत आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर आता सचिन वाझेनेच आणखी एका पत्रातून स्फोट केलाय. सचिन वाझेने मीडियाला 3 पानांचे पत्र शेअर केले आहे. त्यामध्ये, शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांनीही खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. त्यावरुन, राजकारण चांगलच तापलं असून संजय राऊत यांनी परब यांची पाठराखण केली आहे.
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यास कोर्टाने 9 एप्रिलपर्यंत NIA कोठडी ठोठावली आहे. सचिन वाझेने मीडियाला 5 पानांचे पत्र शेअर केले आहे. त्या पत्रात नोकरी टिकवून ठेवण्यासाठी 2 कोटी रुपये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे कथित पत्र 5 पानांचे असून महाविकास आघाडीच्या आणखी एका नेत्याचे नाव या पत्रात असल्याने खळबळ माजली आहे. त्यानंतर, अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप फेटाळले आहेत.
"सचिन वाझेनं लिहिलेल्या पत्रात माझ्यावर काही आरोप करण्यात आलेत. ते सर्व आरोप मी धादांत खोटे आहे. मी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. ते माझे दैवत आहे. त्यांची आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो माझ्यावरील आरोपांमध्ये काडीचंही तथ्य नाही. सरकारला बदनाम करण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे. हफ्तेखोरीचे संस्कार माझ्यावर नाहीत", असं अनिल परब म्हणाले. परब यांच्या या शपथेची री ओढत संजय राऊत यांनी त्यांची पाठाराखण केलीय.
महाराष्ट्र सरकारला अस्थीर करण्याचा प्रयत्न सरकार स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून होत आहे. पण, त्यामुळे सरकार अस्थीर होणार नसून सरकारला अस्थीर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. तुरुंगात असेलल्या लोकांकडून पत्र लिहून घेतलं जात आहे. याप्रकारचं राजकारण यापूर्वी राज्यात किंवा देशात कधीही झालं नाही, असे म्हणत राऊत यांनी थेट भाजपवरच आरोप केले आहेत.
अनिल परब, अजित पवार आणि अनिल देशमुख यांचे नाव कोण घेत आहे, तो व्यक्ती जो एका गंभीर गुन्ह्यात आरोपी आहे. त्या व्यक्तीकडून ही नावे लिहून घेतली जात आहेत, हे राजकीय षडयंत्र आहे. अनिल परब यांना मी जवळून ओळखतो, यांसारख्या कामात ते कधीच नाहीत. कोणताच शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंची खोटी शपथ घेऊ शकत नाही. अनिल परब यांनी घेतलेल्या शपथेवर माझा पूर्ण विश्वास आहे, असेही स्पष्टीकरण राऊत यांनी सचिन वाझे लेटरबॉम्बवर दिले आहे.
अतुल भातखळकर यांनीही केलं टार्गेट
पुनर्वसन करण्यासाठी अनिल देशमुख यांनी 2 कोटी मागितल्याचा गौप्यस्फोट सचिन वाझेच्या कथित पत्रात करण्यात आला आहे. भ्रष्ट कारभाराचे रोज नवे उच्चांक निर्माण होतायत. ठाकरे सरकारने करून दाखवले यात आता कुणालाच शंका नाही, असा टोला भातखळकर यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.
मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्याचा डाव
माझा या दोन्ही विषयाशी काहीही संबंध नाही. माझ्या आडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्याचा हा डाव आहे. याप्रकरणातून सरकारची आणि माझी बदनामी भाजपाकडून बदनामी करण्यात येत आहे. मात्र, मी लढणारा कार्यकर्ता आहे, मी कायदेशीर मार्गाने लढाई लढणार आहे. माझा गृहखात्याशी काय संबंध?. शिवसेना पक्षाचे पोलिसांशी संबंधित प्रश्न मी पाहात होतो. मंत्रीपदावर असतानाही आणि नसतानाही मी हे विषय गेल्या कित्येक वर्षांपासून हाताळतो आहे. शिवसैनिकांची अनेक कामे मी पोलिसांशी बोलून करतो, ते माझे कामच आहे, असेही परब यांनी म्हटलं. दरम्यान, याबाबत, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मुख्यमंत्री यासंदर्भात भाष्य करतील, असेही त्यांनी म्हटलं.