मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर जेलिटीनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळल्यापासून सुरु झालेल्या सचिन वाझे प्रकरणाला रोज नवे वळण मिळत आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर आता सचिन वाझेनेच आणखी एका पत्रातून स्फोट केलाय. सचिन वाझेने मीडियाला 3 पानांचे पत्र शेअर केले आहे. त्या पत्रात नोकरी टिकवून ठेवण्यासाठी 2 कोटी रुपये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी मागितल्याचा गंभीर आरोप त्याने केला आहे. त्यानंतर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी परब यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यास कोर्टाने 9 एप्रिलपर्यंत NIA कोठडी ठोठावली आहे. सचिन वाझेने मीडियाला 5 पानांचे पत्र शेअर केले आहे. त्या पत्रात नोकरी टिकवून ठेवण्यासाठी 2 कोटी रुपये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे कथित पत्र 5 पानांचे असून महाविकास आघाडीच्या आणखी एका नेत्याचे नाव या पत्रात असल्याने खळबळ माजली आहे.
सचिन वाझेने आपल्या पत्रात शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचे नाव घेतले आहे. अनिल परब यांनीही आपल्याला खंडणी वसूल करायला सांगितली, असा खळबळजनक आरोप वाझेंनी कोर्टापुढे सादर केलेल्या पत्रातून केला आहे. त्यानंतर भाजपा नेते आक्रमक झाले असून चंद्रकात पाटील यांनी ट्विट करुन अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच, आता राजीनाम्यासाठी कोर्टाच्या आदेशाची वाट पहायची का? असा टोलाही त्यांनी लगावला.
अतुल भातखळकर यांनीही केलं टार्गेट
पुनर्वसन करण्यासाठी अनिल देशमुख यांनी 2 कोटी मागितल्याचा गौप्यस्फोट सचिन वाझेच्या कथित पत्रात करण्यात आला आहे. भ्रष्ट कारभाराचे रोज नवे उच्चांक निर्माण होतायत. ठाकरे सरकारने करून दाखवले यात आता कुणालाच शंका नाही, असा टोला भातखळकर यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.
अनिल परब यांनी आरोप फेटाळले
"सचिन वाझेनं लिहिलेल्या पत्रात माझ्यावर काही आरोप करण्यात आलेत. ते सर्व आरोप मी धादांत खोटे आहे. मी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. ते माझे दैवत आहे. त्यांची आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो माझ्यावरील आरोपांमध्ये काडीचंही तथ्य नाही. सरकारला बदनाम करण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे. हफ्तेखोरीचे संस्कार माझ्यावर नाहीत", असं अनिल परब म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्याचा डाव
माझा या दोन्ही विषयाशी काहीही संबंध नाही. माझ्या आडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्याचा हा डाव आहे. याप्रकरणातून सरकारची आणि माझी बदनामी भाजपाकडून बदनामी करण्यात येत आहे. मात्र, मी लढणारा कार्यकर्ता आहे, मी कायदेशीर मार्गाने लढाई लढणार आहे. माझा गृहखात्याशी काय संबंध?. शिवसेना पक्षाचे पोलिसांशी संबंधित प्रश्न मी पाहात होतो. मंत्रीपदावर असतानाही आणि नसतानाही मी हे विषय गेल्या कित्येक वर्षांपासून हाताळतो आहे. शिवसैनिकांची अनेक कामे मी पोलिसांशी बोलून करतो, ते माझे कामच आहे, असेही परब यांनी म्हटलं. दरम्यान, याबाबत, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मुख्यमंत्री यासंदर्भात भाष्य करतील, असेही त्यांनी म्हटलं.