Join us

उपचारासाठी वाझे सहकार्य करत नाही! तळोजा कारागृहाची न्यायालयात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 6:04 AM

बायपास सर्जरी झालेल्या सचिन वाझेला तळोजा कारागृहातील उच्च सुरक्षा कक्षात ठेवण्यात आले आहे.

मुंबई : प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवण्याच्या तसेच व्यावसायिक मनसुख हिरेन याच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेला निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याच्याविरोधात तळोजा कारागृहाने विशेष एनआयए न्यायालयात तक्रार केली आहे. आजारी असलेल्या वाझेने कारागृहाच्या रुग्णालयात उपचार घेण्यास नकार दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

बायपास सर्जरी झालेल्या सचिन वाझेला तळोजा कारागृहातील उच्च सुरक्षा कक्षात ठेवण्यात आले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती अस्वस्थ आहे. त्याला उलट्या होत असून चक्करही आली. वाझेवर उपचार करण्यासाठी कारागृहातील डॉक्टरांना बोलाविण्यात आले. डॉक्टरांनी त्याला कारागृहाच्या रुग्णालयात हलविण्यास सांगितले. मात्र, वाझेने उपचार घेण्यास स्पष्टपणे नकार दिला. वाझेचा ईसीजी काढण्यात आला परंतु त्यात काहीही असामान्य आढळले नाही. परंतु खबरदारी म्हणून वाझेला कारागृहातील रुग्णालात ठेवण्याची सूचना डॉक्टरांनी केली. वाझेला मधुमेह आहे. त्यामुळे त्याला जर अस्वस्थ वाटत असेल तर त्याने रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे कारागृहाने न्यायालयात केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

कदाचित बाहेरील रुग्णालयात उपचार घेण्याची संधी मिळेल, अशी वाझे याची अपेक्षा असावी. उपचार घेण्यास नकार देऊन तो कारागृहाच्या नियमांचे उल्लंघन करत असून आम्ही ते न्यायालयाच्या निदर्शनास आणू इच्छितो, असे कारागृह प्रशासनाने तक्रारीत म्हटले आहे.

वाझेच्या वकिलांनी फेटाळले आरोप

 वाझेच्या वकिलांनी कारागृह प्रशासनाचे आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्या अशिलांची रुग्णालयात नेण्यापूर्वी कोणतीही तपासणी करण्यात आली नाही.

 सुरक्षेच्या कारणास्तव वाझेला रुग्णालयात प्रवेश देण्यात आला नाही. त्याशिवाय रुग्णालय अस्वच्छ आहे, अशी माहिती त्याच्या वकिलांनी न्यायालयाला दिली.

 दरम्यान, एनआयएने वाझेच्या जामीन अर्जावर उत्तर देण्यासाठी आणखी एकदा वेळ मागितली. वाझेच्या वकिलांनी आक्षेप घेतला. मात्र, न्यायालयाने एनआयएला अखेरची संधी देत पुढील सुनावणी १ जूनला ठेवली.

टॅग्स :सचिन वाझेपोलिसन्यायालय