Sachin Vaze: परमबीर यांच्याकडूनच सचिन वाझेची ‘घरवापसी’; निलंबन आढावा समितीच्या बैठकीत निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 06:31 AM2021-03-22T06:31:08+5:302021-03-22T06:33:19+5:30
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व विरोधकांनी शिवसेनेच्या आग्रहावरून वाझेला खात्यात घेतल्याचा आरोप केला आहे.
जमीर काझी
मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर थेटपणे भ्रष्टाचाराचे आरोप करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिलेले परमबीर सिंग यांनीच एपीआय सचिन वाझेची मुंबई पोलीस दलात ‘घरवापसी’ घडवून आणली होती. त्यांच्या अध्यक्षतेखाली निलंबन आढावा समितीने गेल्या वर्षी ५ जूनला हा निर्णय घेतला. त्यानंतर ३ दिवसांनी वाझे मुंबई पोलीस दलात रुजू झाले असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व विरोधकांनी शिवसेनेच्या आग्रहावरून वाझेला खात्यात घेतल्याचा आरोप केला आहे. प्रत्यक्षात कागदावर मात्र तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांच्या अधिकारात हा निर्णय झाला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम(४),(५),(क)च्या अनुषंगाने त्याला सेवेत घेण्यात आले होते.
अँटेलियाच्या परिसरात मिळालेल्या स्फोटक कारच्या गुन्ह्यात एपीआय सचिन वाझेला १३ मार्चला मध्यरात्री एनआयएने अटक केली. त्यानंतर राज्यात सातत्याने ‘स्फोट’ घडत राहिले. देशमुखांनी आरोप फेटाळून लावताना वाझे व एसएस ब्रँचचे एसीपी पाटील हे परमबीर यांच्याशी पूर्वीपासून संबंधित असल्याचा दावा केला. त्यामुळे वाझेला पुन्हा सेवेत घेण्यामागील माहिती घेतली असता त्यातून अनेक बाबी समोर आल्या आहेत. ख्वाजा युनूस प्रकरणी वाझेला ३ मार्च २००४ रोजी अटक झाली होती. त्यानंतर त्याच वर्षी १२ मार्चला त्याला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल १६ वर्षे खात्याबाहेर होता. ५ जून २०२० रोजी आयुक्त परमबीर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली निलंबन आढावा समितीच्या बैठकीत त्याला पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय झाला.
निलंबन समितीच्या आढावा बैठकीत आयुक्ताशिवाय सहआयुक्त (प्रशासन), सशस्त्र दलाचे अप्पर आयुक्त, एसीबीचे अप्पर आयुक्त व मंत्रालय सुरक्षा उपायुक्त उपस्थित होते. यावेळी ११३ प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. त्यापैकी १८ जणांचे निलंबन मागे घेण्यात आले.
हिरेन हत्या प्रकरणाचा तपास आज एनआयए ताब्यात घेणार
राज्यातील राजकारण व पोलीस वर्तुळात खळबळ उडवून दिलेल्या अँटिलियाच्या स्फोटक कारबरोबरच ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास एटीएसकडून राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) वर्ग करण्याचा केंद्रीय गृहविभागाने घेतला आहे.
मात्र त्याबाबत राज्य सरकारकडून आदेश मिळाला नसल्याने या प्रकरणाचा तपास अद्यापही एटीएसकडे आहे. सोमवारी त्याबाबत आदेश जारी केले जातील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
मनसुख हिरेन यांच्या हत्येचा छडा लावण्यात एटीएसला यश आले आहे. या कटाचा मुख्य सूत्रधार वादग्रस्त सचिन वाझे हाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या कटात सामील असलेल्या एका निलंबित कॉन्स्टेबलसह बुकीला अटक केली आहे. तपासासाठी वाझेचा एनआयएकडून ताबा मिळवण्यासाठी मागणी केली आहे. त्याच वेळी या प्रकरणाचा तपास एनआयकडे वर्ग करण्याचा निर्णय केंद्रीय गृहविभागाने घेतला आहे.
हिरेनच्या वकिलाकडील चौकशीमुळे वाझेविरुद्ध पुराव्याला बळ
ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन याचे वकील के.एच. गिरवी यांच्याकडे एनआयएच्या पथकाने केलेल्या चौकशीतून वाझेविरुद्ध आरोपाला पूरक माहिती मिळाली आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्धचे पुरावे भक्कम झाले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. गिरवी यांच्याकडे शनिवारी सुमारे चार तास चौकशी केली. वाझे यानेच पोलिसांकडून होत असलेल्या त्रासाबाबत हिरेन यांना पत्र लिहून दिले होते, असे त्यांनी सांगितले असल्याचे समजते. वाझे याला ६ महिन्यांपासून ओळखत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.