Join us

Sachin Vaze : 'सचिन वाझेंचा लेटरबॉम्ब, ठाकरे सरकारने करुन दाखवलं यात आता शंका नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 6:39 PM

भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकावर टीकेचे बाण सोडले आहेत.

ठळक मुद्देनिलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यास कोर्टाने 9 एप्रिलपर्यंत NIA कोठडी ठोठावली आहे. सचिन वाझेने मीडियाला 5 पानांचे पत्र शेअर केले आहे.

मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर जेलिटीनच्या काड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळल्यापासून सुरु झालेल्या सचिन वाझे प्रकरणाला रोज नवे वळण मिळत आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर आता सचिन वाझेनेच आणखी एका पत्रातून स्फोट केलाय. सचिन वाझेने मीडियाला 3 पानांचे पत्र शेअर केले आहे. त्या पत्रात नोकरी टिकवून ठेवण्यासाठी 2 कोटी रुपये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी मागितल्याचा गंभीर आरोप त्याने केला आहे. त्यानंतर, भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकावर टीकेचे बाण सोडले आहेत.

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यास कोर्टाने 9 एप्रिलपर्यंत NIA कोठडी ठोठावली आहे. सचिन वाझेने मीडियाला 5 पानांचे पत्र शेअर केले आहे. त्या पत्रात नोकरी टिकवून ठेवण्यासाठी 2 कोटी रुपये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे कथित पत्र 5 पानांचे असून महाविकास आघाडीच्या आणखी एका नेत्याचे नाव या पत्रात  असल्याने खळबळ माजली आहे.

पवार मला नोकरीवर ठेवू इच्छित नव्हते, मात्र मी पवार साहेबांची समजूत काढेन, असे अनिल देशमुख यांनी म्हटल्याचे लिहिले आहे. पण, सचिन वाझेने 2 कोटी रुपये देण्यास असमर्थता दर्शवली, असेही पत्रात म्हटले आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग(Param Bir Singh) यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे धक्कादायक आरोप लावले होते, या प्रकरणात अनिल देशमुखांना खुर्चीवरुन पायउतार व्हावं लागलं आहे. हायकोर्टाने या प्रकरणाची 15 दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआय(CBI) दिले आहेत. त्यानंतर अनिल देशमुखांनी नैतिकतेच्या आधारावर गृहमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे भाजपा नेत्यांना ठाकरे सरकारवर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. आता, पुन्हा एकदा सचिन वाझेंच्या या नव्या लेटरबॉम्बमुळे महाविकास आघाडीला नव्या अडचणीला तोंड द्यावं लागणार आहे. त्यातच, भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. 

पुनर्वसन करण्यासाठी अनिल देशमुख यांनी 2 कोटी मागितल्याचा गौप्यस्फोट सचिन वाझेच्या कथित पत्रात करण्यात आला आहे. भ्रष्ट कारभाराचे रोज नवे उच्चांक निर्माण होतायत. ठाकरे सरकारने करून दाखवले यात आता कुणालाच शंका नाही, असा टोला भातखळकर यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. 

अनिल परब यांचेही नाव

सचिन वाझेने आपल्या पत्रात शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचेही नाव घेतले आहे. वाझेंच्या जबाबामध्ये शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांचंही नाव आहे. अनिल परब यांनीही आपल्याला खंडणी वसूल करायला सांगितलं, असा खळबळजनक आरोप वाझेंनी कोर्टापुढे सादर केलेल्या पत्रातून केला आहे. 

काय होता परमबीर सिंगाचा आरोप?

मुंबईच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांनी वाझेला महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते. असा आरोप करीत राज्याच्या राजकारणात आणि पोलीस दलात खळबळ उडवून दिली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते असा धक्कादायक आरोप त्यांनी केला होता.

टॅग्स :मुंबईसचिन वाझेअनिल देशमुखअतुल भातखळकरभाजपा