सचिन वाझे होणार ‘माफीचा साक्षीदार’, ईडीने दिली सहमती, अनिल देशमुख अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 12:23 PM2022-06-23T12:23:50+5:302022-06-23T12:24:24+5:30
Sachin Vaze : निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ‘माफीचा साक्षीदार’ करण्यास ईडीने बुधवारी सहमती दर्शविली. त्यामुळे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मुंबई : निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ‘माफीचा साक्षीदार’ करण्यास ईडीने बुधवारी सहमती दर्शविली. त्यामुळे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
अनिल देशमुख भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयने सचिन वाझेला ‘माफीचा साक्षीदार’ होण्यास परवानगी दिली. त्यानंतर वाझे आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने देशमुख यांच्यावर नोंदविलेल्या गुन्ह्याच्या खटल्यातही ‘माफीचा साक्षीदार’ करण्यासाठी पत्र लिहिले. त्याच्या पत्राला उत्तर देत ईडीने वाझेला ‘माफीचा साक्षीदार’ करण्याची तयारी दर्शविली. फेब्रुवारीमध्ये वाझेने ‘माफीचा साक्षीदार’ करण्यासाठी ईडीकडे अर्ज सादर केला. आपल्याला या प्रकरणात माफी द्यावी व ‘माफीचा साक्षीदार’ करावे, असे वाझेने पत्र लिहिले.
मे महिन्यात सीबीआयने अनिल देशमुख भ्रष्टाचार प्रकरणी वाझेला माफीचा साक्षीदार करण्यास तयारी दर्शविली. त्यानंतर विशेष सीबीआयनेही त्यास परवानगी दिली. त्यानंतर ९ जून रोजी वाझेने विशेष पीएमएलए न्यायालयात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माफीचा साक्षीदार करण्यासाठी अर्ज केला. त्यावर न्यायालयाने ईडीला उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानंतर ईडीने त्यांचे उत्तर दाखल करत वाझेची विनंती मान्य केली.
अँटालिया बॉम्बस्फोटके प्रकरण व ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन हत्येप्रकरणी वाझेला गेल्यावर्षी अटक करण्यात आली. त्यानंतर भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयनेही त्याला अटक केली. सध्या वाझे न्यायालयीन कोठडीत आहे.