अँटिलियाप्रकरणी एनआयच्या तपासाला सचिन वाझेचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 09:35 AM2024-08-20T09:35:45+5:302024-08-20T09:36:07+5:30
या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने यूएपीए लागू करण्यात आला आहे.
मुंबई : अँटिलिया स्फोटक प्रकरणात यूएपीए लागू करण्याच्या निर्णयाला तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी एनआयएने केलेल्या तपासाला निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
याबाबत वाझे याने दाखल केलेल्या याचिकेवर न्या. भारती डांग्रे व न्या. मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. तेव्हा खंडपीठाने एनआयएला याबाबत उत्तर देण्याचे निर्देश दिले. वाझेने दाखल केलेली १८५ पानांची याचिका एका प्रबंधासारखी आहे, असे म्हणत न्यायालयाने वाझे याच्यावर टीकादेखील केली. त्यावर उत्तर देताना वाझेचे वकील आबाद पौडा यांनी तुरुंगात बसून आरोपीला या कामाशिवाय अन्य कोणतेही काम नाही, असे म्हटले.
या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने यूएपीए लागू करण्यात आला आहे. यूएपीए लागू करण्यापूर्वीच एनआयएने तपास करण्यास सुरुवात केली. मुळात यूएपीएच्या तरतुदी साध्या प्रकरणासाठी लागू करू शकत नाही. मुंबईतील एका घराबाहेरून जिलेटीन जप्त करण्यात आले. त्यामुळे कोणताही दहशतवाद निर्माण झाला नाही, असा युक्तिवाद पौडा यांनी केला. केंद्र सरकारने आदेश देण्यापूर्वीच एनआयएने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता याकडे लक्ष वेधत वाझे याने त्या तपासाला आव्हान दिले. तसेच याचिका प्रलंबित असेपर्यंत सुटका करण्याची मागणीही न्यायालयाकडे केली आहे.
न्यायालयाने एनआयएला उत्तर देण्याचे निर्देश देत पुढील सुनावणी २३ सप्टेंबर रोजी ठेवली. २५ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन सापडले होते.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, वाझे याने अन्य आरोपींच्या मदतीने ठाण्याचे व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मालकीच्या एसयूव्हीमध्ये स्फोटके भरली होती. जेव्हा हिरेन यांनी पोलिसांना सत्य सांगण्याची धमकी दिली, तेव्हा वाझे व अन्य आरोपींनी त्याची हत्या केली.