मुंबई : १०० कोटी वसुलीप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने ‘माफीचा साक्षीदार’ होण्यासाठी केलेला अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने बुधवारी मंजूर केला. त्यामुळे या प्रकरणातील मुख्य आरोपी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
सीबीआयने अटक करण्यापूर्वी आणि त्यानंतरही मी त्यांना तपासाला सहकार्य केले आहे. सीआरपीसीअंतर्गत दंडाधिकाऱ्यांनी कबुली जबाबही घेतला, असे वाझे याने अर्जात म्हटले होते. सीबीआयने त्याला माफीचा साक्षीदार करून घेण्यास सहमती दर्शवली. तत्पूर्वी त्यांनी काही अटी घातल्या. बुधवारी विशेष न्यायालयाचे न्या. डी. पी. शिंगाडे यांनी वाझेचा माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज स्वीकारला. अटींच्या अधीन राहून अर्ज स्वीकारत आहे, असे न्यायाधीशांनी म्हटले. या आदेशानंतर सचिन वाझे सरकारी वकिलांचा साक्षीदार म्हणून खटल्यादरम्यान न्यायालयात साक्ष नोंदवेल. अँटेलिया स्फोटके व ठाण्याचा व्यावसायिक मनसुख हिरेन हत्याप्रकरणी वाझेला गेल्यावर्षी मार्च महिन्यात अटक करण्यात आली होती.
नेमके काय आहे प्रकरण?
वाझे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. देशमुखांनी पोलीस अधिकाऱ्यांना मुंबईतील रेस्टॉरंट व बार मालकांकडून दरमहा १०० कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. याप्रकरणी सीबीआयने गेल्यावर्षी एप्रिलमध्ये देशमुख व वाझे यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. उच्च न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला.
वाझेची ओपन हार्ट सर्जरी सुरुवातीला भिवंडी येथील एका खासगी रुग्णालयात सचिन वाझे उपचार घेत होते. हृदयविकाराचा त्रास असल्याने गेल्या वर्षी १४ सप्टेंबर रोजी खासगी रुग्णालयात त्यांच्यावर ओपन हार्ट सर्जरी पार पडली होती.
जबाबाची अदलाबदल
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी चांदीवाल आयोगाकडून सुरू झाली त्यावेळी सुरुवातीला वाझेने जबाबादरम्यान देशमुख यांना क्लीन चिट दिली. मात्र, काही दिवसांनी यूटर्न घेत, आधी दबावाखाली प्रश्नांची उत्तरे दिल्याचे त्याने आयोगाला सांगितले. यापूर्वीदेखील देशमुख यांनी माझा मानसिक छळ केला. राजीनामा दिल्यानंतरही मला त्रास देत असल्याचे आयोगाला सांगितले. मात्र, आयोगाने नोंदविलेल्या निरीक्षणात जबाब नोंदविताना तसेच उलट तपासणीदरम्यान वाझे कुठल्याही दबावाखाली दिसून आले नसल्याचे नमूद केले होते. त्यापाठोपाठ थेट माफीचा साक्षीदार म्हणून वाझेचा अर्ज समोर आला.