हिरेन यांच्या मृत्यूमागे सचिन वाझे ? विधानसभेत निलंबनाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 06:08 AM2021-03-10T06:08:20+5:302021-03-10T06:09:24+5:30
निलंबनाच्या मागणीवरून विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ; आमदारांची झटापट टळली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख सचिन वाझे यांनी आपल्या पतीचा खून केल्याचा संशय मनसुख हिरेन यांच्या पत्नीने एटीएसला दिलेल्या जबाबात व्यक्त केला असल्याचा आरोप करत वाझे यांना तत्काळ निलंबित व अटक करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत करताच अभूतपूर्व गोंधळ झाला. कामकाज आठ वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झाले. हिरेन यांच्या पत्नीने केलेल्या आरोपांमुळे या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे.
वाझेंचे निलंबन आणि अटकेवर फडणवीस ठाम असून सरकार बुधवारी विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागलेले आहे. फडणवीसांनी सरकारला घेरल्याने सत्तापक्षाने अन्वय नाईक आणि खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येवरून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
सत्ताधारी-विराेधकांमध्ये जुंपली
n उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्यासमोर स्फोटकांसह सापडलेली
स्कॉर्पिओ गाडी ज्यांची होती ते मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीमध्ये ५ मार्च रोजी सापडला होता.
n हिरेनची पत्नी विमला यांनी एटीएसला दिलेल्या जबाबाची प्रतच फडणवीस यांनी मंगळवारी सभागृहात फडकवली. त्यामुळे सभागृह अवाक् झाले. वाझेंवर तत्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजप सदस्य आक्रमक झाले.
n वाझे पूर्वी कोणत्या पक्षात होते? हिरेन यांचे शेवटचे मोबाइल लोकेशन सापडले ते धनंजय गावडे कोणत्या पक्षात आहेत? वाझेंबाबत पुरावे असताना त्यांना का पाठीशी घातले जात आहे? असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला.
n त्यावर, मग मोहन डेलकर प्रकरणात ज्यांची नावे आहेत, त्यांनाही अटक झाली पाहिजे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हणताच व काँग्रेसचे नाना पटोले यांनी त्यांचे समर्थन करताच गोंधळ अधिकच वाढला.
वाझे यांचा जबाब नोंदवला
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) तपास सुरू असून हिरेन यांच्या मृत्यूमुळे संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले सचिन वाझे यांचाही जबाब एटीएसने नोंदविला आहे.
शब्द का फिरवला?
सभागृहातील कोंडी फोडण्यासाठी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या दालनातील बैठकीत वाझेंना निलंबित करण्याचा शब्द उपमुख्यमंत्र्यांनी दिला होता, परंतु नंतर कोणाचा दबाव आला, कोणाशी चर्चा झाली, त्यांना कोण पाठीशी घालत आहे, असा सवाल फडणवीस यांनी केला.
मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास एटीएसकडून केला जात आहे. त्यातून सत्य काय ते बाहेर येईलच, अशी ग्वाही मी देतो. विरोधकांकडे अधिकचे पुरावे असतील तर ते त्यांनी द्यावेत. - अनिल देशमुख, गृहमंत्री
गोंधळानंतर कामकाज तहकूब
उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करताच भाजप-शिवसेनेचे आमदार वेलमध्ये आमनेसामने आले. भाजपचे नारायण कुचे आणि शिवसेनेचे महेंद्र दळवी एकमेकांच्या अंगावर धावले. जोरदार घोषणायुद्ध सुरू झाले, ते सभागृहाचे कामकाज आठ वेळा व नंतर दिवसभरासाठी तहकूब होईपर्यंत सुरूच होते. फडणवीस यांच्या तोफेला उत्तर देण्याचे काम शिवसेना आणि काँग्रेसचे पटोले यांनी केले; पण राष्ट्रवादीचे सदस्य शांत होते.
डेलकर यांच्या आत्महत्येची एसआयटीमार्फत चौकशी
दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत केलेल्या आत्महत्येची चौकशी एसआयटीमार्फत केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी विधानसभेत केली.