लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सचिन वाझे म्हणजे काय ओसामा बिन लादेन आहे का? एका आरोपीला उचलून आणले म्हणून त्याला लटकवताय का? चौकशीत काय ते सत्य बाहेर येईलच पण ‘आधी फाशी अन् मग चौकशी’ ही कोणती नवी पद्धत आणली आहे, असा हल्लाबोल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
विधिमंडळ अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांनी पहिल्यांदाच पोलीस अधिकारी सचिन वाझेंबाबत भाष्य केले. मनसुख हिरेनची हत्या झाली असून त्यात सचिन वाझेंचा हात असल्याचा आरोप फडणवीस यांनी मनसुख यांच्या पत्नीने एसआयटीकडे दिलेल्या जबाबाच्या (सीडीआर) आधारे केला होता. त्यावर मुख्यमंत्री आज पहिल्यांदाच बोलले. हा सीडीआर फडणवीस यांच्याकडे गेला हा गुन्हा आहे, त्याचीही चौकशी करावी लागेल असे मुख्यमंत्री म्हणाले. आता तपास यंत्रणेला त्यांनी सहकार्य करावे आणि तो सीडीआर द्यावा. विरोधकांनी नि:पक्षपातीपणाला चष्मा लावावा. कॉल रेकॉर्ड, सीडीआरवरुन लगेच कुणाला फाशी देण्याची भूमिका घ्यायची का? असे असेल तर मग पोलीस पाहिजेतच कशाला? त्यांनीच तपास करावा असे मुख्यमंत्र्यांनी सुनावले. हिरेन यांच्या मृत्यूचे प्रकरण आम्ही गांभीर्यानेच घेतले आहे. पण उगाच कुणाला टार्गेट करायचं, अब्रूचे धिंडवडे काढायचे अन् मग तपासात निर्दोष आढळल्यावर काय करणार असा सवालही ठाकरे यांनी केला.
हत्या आत्महत्या मृत्यू झाल्यानंतर गांभीर्याने दखल घेणे हे काम आहे. मोहन डेलकर यांनी आत्महत्या केलेली आहे. सुुसाइड नोटमध्ये काही जणांची नावे आहेत. तपास सुरू झालेला आहे. आधी फाशी मग तपास ही पद्धत नाही होऊ शकत, ही सरकारची पद्धत नाही. त्यांनीही सरकार चालवलेलं आहे. टार्गेट करायचं, धिंडवडे काढायचे मग तपासात आले की तो नाहीच तर मग कोणीही असला तरी कारवाई करणार, असे त्यांनी स्पष्ट केले.
वाझेंचा शिवसेनेशी संबंध नाहीसचिन वाझे २००८ च्या सुमारास शिवसेनेत होते पण नंतर त्यांनी शिवसेना सदस्यत्वाचे नूतनीकरण केलेले नाही. ते आमच्या पक्षाचे नेते नाहीत. पण तिकडे खा.मोहन डेलकर यांच्या सुसाइड नोटमध्ये भाजपच्या नेत्यांची नावे आहेत, त्यांचे काय असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.