क्राइम ब्रँच, एटीएसच्या अधिकाऱ्यांकडेही झाडाझडती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ कारमध्ये आढळलेल्या जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीच्या पत्राप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) शनिवारी ‘ॲक्शन मोड’मध्ये आली आहे. या प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची ८ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. त्यांनी या प्रकरणाचा केलेला तपास आणि स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूबद्दल सविस्तरपणे जबाब नोंदविल्याचे सूत्रांनी सांगितले.
पेडर रोड येथील एनआयएच्या कार्यालयात वाझे यांची झाडाझडती सुरू आहे. त्याचबरोबर मुंबई क्राइम ब्रँचचे साहाय्यक आयुक्त नितीन अलकनुरे व एटीएसच्या अधिकाऱ्यांकडूनही त्यांनी केलेल्या तपासाची माहिती घेण्यात येत आहे.
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ २५ फेब्रुवारीला पार्क केलेल्या कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. त्याचा तपास सुरुवातीला मुंबई क्राइम ब्रँच करत होती. त्यानंतर ५ मार्चला कारचे मालक हिरेन यांचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह सापडल्यानंतर तपास एटीएसकडे वर्ग करण्यात आला. तर केंद्र सरकारने ८ मार्चला हा तपास एनआयएकडे सोपविला आहे. विशेष महानिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली तीन पथकांद्वारे हा तपास केला जात आहे. पेडर रोड येथील कार्यालयात शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास वाझे यांना जबाब नोंदविण्यासाठी बोलाविले होते. त्या वेळी त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेण्यात आली. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दुपारी ४ च्या सुमारास क्राइम ब्रँचचे एसीपी अलकनुरे यांना चौकशीसाठी बोलावले. तर त्यानंतर तासाभरात एटीएसचे अधिकारीही तेथे पोहोचले. त्यांच्याकडून स्वतंत्रपणे व नंतर समोरासमोर बसवून त्यांनी केलेल्या तपासाची माहिती घेतली जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
जगाला गुडबाय म्हणण्याची वेळ!
आपल्यावरील आरोपाला वाझे यांनी व्हाॅट्सॲप स्टेटसवरून उत्तर दिले. त्यात म्हटले आहे की, ‘३ मार्च २००४ रोजी सीआयडीमधील काही जणांनी मला खोट्या आरोपांखाली अटक केली. इतिहासाची पुनरावृत्ती होणार अशी शक्यता आहे. आधी हे घडले तेव्हा माझ्याकडे १७ वर्षांचा कालावधी होता. आशा होती, धैर्य होते. आयुष्य आणि नोकरीमधील अनेक वर्षे शिल्लक होती. मात्र, आता माझ्याकडे नोकरीची आणि आयुष्याचीही १७ वर्षे शिल्लक नाहीत तसेच अशा पद्धतीने जगण्याचे धैर्यही नाही. मला वाटते जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ आली आहे.’
वाझे यांना न्यायालयाकडून तत्काळ दिलासा नाही
सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. शनिवारी झालेल्या सुनावणीत त्यांचा अर्ज फेटाळून न्यायालयाने पुढील सुनावणी १९ मार्चला ठेवली आहे.