मुंबई : सचिन वाझे हे एक हुशार आणि सक्षम अधिकारी आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक ज्या पद्धतीने मुंबईत आले, त्यावरून त्यांना गुन्ह्याचा तपास करायचा होता की वाझे यांना अटक करून राजकीय हिशेब चुकता करायचा होता, असा प्रश्न शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी रविवारी माध्यमांसमाेर उपस्थित केला.
सचिन वाझे यांच्या अटकेनंतर राऊत यांनी माध्यमांना सांगितले की, सचिन वाझे उत्तम तपास अधिकारी आहेत. केंद्रीय यंत्रणा राज्याच्या अधिकारांवर अतिक्रमण करीत असल्याचा आरोपही राऊत यांनी यावेळी केला. ज्या पद्धतीने एनआयए या तपासात घुसली, तो प्रकार म्हणजे मुंबई पोलिसांच्या क्षमतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न आहे. मुंबई पोलिसांची क्षमता जगाला माहीत आहे.
मुंबई पोलीस कोणाच्याही दबावाखाली येत नाहीत; पण राज्यात घुसायचे, राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करायचा, केंद्राचा दबाव आणि दहशत आहे हे दाखवायचे अशा पद्धतीने कारवाई करण्यात आली आहे. हे सगळे राजकारण सुरू आहे. सचिन वाझेंना अटक झाली आहे. योग्य ती प्रक्रिया सुरू होईल. यावर मी बोलणार नाही. आरोप ठेवणे आणि प्रत्यक्षात आरोप सिद्ध होणे यांमध्ये खूप मोठे अंतर आहे. या प्रकरणात महाराष्ट्र सरकारची प्रतिष्ठा पणाला लागल्याचेही राऊत यांनी सांगितले. राज्य सरकारने प्रकरणे एटीएसकडे दिली होती. एटीएसने अशा अनेक गुन्ह्याचा तपास करून गुन्हेगारांना फासावर लटकवले. २० जिलेटीनच्या कांड्यांसाठी एनआयए मुंबईत दाखल झाली. यापूर्वी सुशांतसिंह प्रकरणात अशाच पद्धतीने सीबीआय आली. त्यांनी कोणता नवीन तपास केला, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.
तपासातील बाबींच्या आधारे योग्य कारवाई - देशमुख मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कॉर्पिओ गाडीत सापडलेल्या जिलेटीन कांड्या व मनसुख हिरेन यांचा मृत्यूच्या प्रकरणावरुन राज्यातील राजकारण तापले आहे.
यासंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारणा केली असता त्यांनी ठोस वक्तव्य करण्याचे टाळले. मात्र या दोन्ही प्रकरणांचा एटीएस व एनआयए तपास करत आहे. तपासातून ज्या बाबी समोर येतील त्याआधारे केंद्र व राज्य शासनाकडून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले. दरम्यान, सचिन वाझे यांना निलंबित करणार का यासंदर्भातील प्रश्नावर त्यांनी मौन राखले.या दोन्ही प्रकरणांचा एटीएस व एनआयए तपास करत आहे.