सचिन वाझेने ‘बार्क’च्या अधिकाऱ्यांकडुन घेतले ३० लाख?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:06 AM2021-04-12T04:06:33+5:302021-04-12T04:06:33+5:30
ईडीला संशय; टीआरपी घोटाळ्याच्या तपासावेळी वसुली लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अँटिलिया स्फोटक कार व मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणातील ...
ईडीला संशय; टीआरपी घोटाळ्याच्या तपासावेळी वसुली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अँटिलिया स्फोटक कार व मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी असलेला निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेचे आता अन्य कारनामे उघड होऊ लागले आहेत. बहुचर्चित टीआरपी घोटाळ्यात त्याने ‘बार्क’च्या काही अधिकाऱ्यांकडून ३० लाखांची वसुली केली होती. गुन्ह्यात न अडकविण्यासाठी त्याने ही रक्कम घेतली होती, अशी माहिती सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) तपासातून समोर आल्याचे सुत्रांनी सांगितले.
टीआरपी घोटाळ्याचा तपास ईडीकडून स्वतंत्रपणे करण्यात येत आहे. त्यामध्ये मनी लॉण्ड्रिंग तपास करणाऱ्या ईडीला वाझेच्या व्यवहारांबाबत माहिती मिळाल्याचे सांगण्यात आले. मुंबई पोलिसांनी गेल्यावर्षी उघडकीस आणलेल्या टीआरपी घोटाळ्याच्या तपासात रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी व ‘बार्क’चे माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दासगुप्तासह इतरांना अटक करण्यात आली होती.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचा (सीआययू) तत्कालीन प्रभारी वाझे हा चौकशीसाठी ‘बार्क’च्या अधिकाऱ्यांना बोलावत असे. अनेक तास कार्यालयात बसवून ठेवून त्यांचा मानसिक छळ करत असे, कारवाई टाळण्यासाठी त्याने संबंधितांकडून ३० लाख रुपये घेतल्याची माहिती ईडीच्या हाती लागल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे वाझेच्या अडचणी वाढणार असून, एनआयएकडील गुन्ह्यातून जामीन मिळाल्यानंतर त्याला ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागेल, असे सुत्रांनी सांगितले.